मदतीसाठी हात सरसावले...
By admin | Published: June 3, 2014 11:55 PM2014-06-03T23:55:54+5:302014-06-03T23:59:55+5:30
नुकसानीची संयुक्त भरपाई देणार; ११ जूनला कोल्हापुरात शांती मोर्चा
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांनी प्रभावित झालेल्या ज्या शहरात शनिवारी रात्री काही मूठभर समाजकंटकांनी मुस्लिमबांधवांच्या दुकानांवर, वाहनांवर दगडफेक करून, जाळपोळ करून नुकसान केले, त्याच शहराने त्याचे दायित्व स्वीकारत झालेले नुकसान भरून देण्याची जबाबदारी पार पाडण्याचा एक प्रागतिक निर्णय आज, मंगळवारी घेतला. नुसते आवाहन करताच पावणेतीन लाखांचा निधीही गोळा झाला. दरम्यान, येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ११ जूनला कोल्हापुरात शांती मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे विटंबन झाल्याच्या निषेधार्थ शनिवारी रात्री काही समाजकंटकांनी मुस्लिम समाजाला लक्ष्य करत शहरातील त्यांच्या दुकानांवर, वाहनांवर दगडफेक करून जाळपोळ केली होती. या दगडफेकीत व जाळपोळीत मोठे नुकसान झाले आहे. समाजात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रा. एन. डी. पाटील व गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शांतता समिती स्थापन झाली असून, या समितीची बैठक आज झाली. या बैठकीत मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी झालेले नुकसान भरून देण्यासाठी मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला आहे. त्याला हिंदू समाजानेही हातभार लावावा, असे आवाहन केले. आजरेकर यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत बैठकीस जमलेल्या हिंदू समाजातील बांधवांनीही तत्काळ मदतीची घोषणा केली. गोविंद पानसरे यांनी एक लाख, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग व मुख्याध्यापक संघ यांनी ५० हजार, आर. के. पोवार यांनी ११ हजार, रामभाऊ चव्हाण यांनी पाच हजार, अशी मदत जाहीर करून मुस्लिम समाजाच्या नुकसानीचे दायित्व स्वीकारले. बैठकीत पाचशेपासून मदत जाहीर झाली अन् बघता-बघता पावणेतीन लाख रुपयांचा निधी जमा झाला. पुढचे आणखी काही दिवस हा निधी जमा केला जाणार आहे. ज्यांना कोणाला मदत द्यायची आहे, अशा हिंदू व मुस्लिम समाजातील दानशूरांनी गणी आजरेकर व चंद्रकांत यादव यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. कोल्हापूर शहराची परंपरा आणि जातीय सलोखा कायम राहावा, यासाठी ११ जूनला शांती मोर्चा काढण्यात येणार आहे. तोपर्यंत येत्या सहा दिवसांत पेठा-पेठांमधून शांतता राहण्यासाठी शपथा घ्याव्यात, कॅँडल मार्च काढावेत, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आणावा, सोशल मीडियात सापडलेल्या युवा पिढीचे प्रबोधन करावे, गल्लीनिहाय शांतता कमिट्या स्थापन कराव्यात, अशा कमिट्यांच्या बैठका महिन्यातून एकदा घ्याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या. बैठकीत एन. डी. पाटील, गोविंद पानसरे यांच्यासह आर. के. पोवार, निवासराव साळोखे, चंद्रकांत यादव, रामभाऊ चव्हाण, अशोकराव साळोखे, गणी आजरेकर, कादर मलबारी, बाळासाहेब मेढे-पवार, समीर बागवान, समीर नदाफ, वसंतराव मुळीक, नियाज काझी, नगरसेवक आदिल फरास, एस. डी. लाड, जयकुमार शिंदे, फिरोजखान उस्ताद, महंमदशरीफ शेख, गिरीष फोंडे, उदय गायकवाड यांची भाषणे झाली.