शिवरायांचे पुतळे तयार करणाऱ्या हातांमध्ये काैतुकाचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 19:23 IST2021-02-19T19:20:32+5:302021-02-19T19:23:53+5:30
Shivjayanti Sambhaji Brigede Kolhapur- तसे ते परप्रांतीय, रस्त्याकडेला पुतळे, मुर्ती तयार करुन, त्याची विक्री करुन पोटपाणी चालवणारे, पण शुक्रवारचा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. शिवजयंतीचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडने या गोरगरीब कलाकारांच्या हातात नव्या कपड्यांचा आहेर देऊन पुतळ्याच्या माध्यमातून शिवरायांना घरोघरी पोहचवल्याबद्दल आभारही मानले.

शिवरायांचे पुतळे तयार करणाऱ्या हातांमध्ये काैतुकाचा आहेर
कोल्हापूर: तसे ते परप्रांतीय, रस्त्याकडेला पुतळे, मुर्ती तयार करुन, त्याची विक्री करुन पोटपाणी चालवणारे, पण शुक्रवारचा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. शिवजयंतीचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडने या गोरगरीब कलाकारांच्या हातात नव्या कपड्यांचा आहेर देऊन पुतळ्याच्या माध्यमातून शिवरायांना घरोघरी पोहचवल्याबद्दल आभारही मानले.
शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जवळ आल्या की रस्त्याकडेला परप्रांतातून आलेल्या कलाकारांकडून महापुरुषांचे पुतळे तयार करण्याचे काम सुरु होते. रस्त्याकडेला निर्मिती आणि विक्री करणाऱ्या या कलाकार समाजामुळेच महापुरुषांचे पुतळे घरोघरी, मंडळात पोहचतात. पण आतापर्यंत या कलाकारांशी खरेदी विक्रीपुरता संबंध यायचा. त्यांचे म्हणून कधी कौतुक झाले नव्हते. यावर्षीची शिवजयंती मात्र या कलाकारासाठी अनोखा आनंद देणारी ठरली. या सत्काराने हे कलाकारही भारावून गेले.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीम तावडे हॉटेल मार्गावरील फुटपाथवरील विक्री केंंद्रावर पोहचली. त्यांनी या कलाकारांच्या कुटूंबियांचे आभार मानून त्यांना नवीन कपडे भेट दिले. यात मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत सासणे ,ॲड. पृथ्वीराज राणे, ब्रिगेडचे शहराध्यक्ष अभिजित भोसले, निलेश सुतार, शाहीर दिलीप सावंत, भगवान कोईगडे, अभिजीत कांजर, सुजय देसाई, शर्वरी मानगावे, मदन परीट, बबलू ठोंबरे यांनी सहभाग घेतला.