हनुमान तरुण मंडळाचे ‘अग्निदिव्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:22 AM2019-04-15T00:22:12+5:302019-04-15T00:22:18+5:30

सोंगी भजन, कीर्तन, शाहिरी अशा माध्यमांतून गावातील जुन्या-जाणत्या लोकांच्या कला पाहत असताना काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्या ...

Hanuman Tarun Mandal's 'Agnidi' | हनुमान तरुण मंडळाचे ‘अग्निदिव्य’

हनुमान तरुण मंडळाचे ‘अग्निदिव्य’

Next

सोंगी भजन, कीर्तन, शाहिरी अशा माध्यमांतून गावातील जुन्या-जाणत्या लोकांच्या कला पाहत असताना काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्या माध्यमातून नाटकाचे बीज रुजले. शहरात विविध ठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर, कामगारांतील कलाकारांच्या या मंडळाने महाराष्ट्रात आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे. पारावरचे नाटक ते राज्यस्तरीय स्पर्धा, चित्रपटांपर्यंत उत्तुंग भरारी घेतली आहे.
काळम्मावाडी येथील हनुमान तरुण मंडळाची स्थापना सन १९८५ मध्ये झाली. यातून शहरातील चहागाडी, सेंट्रिंग, विविध दुकानांमध्ये मजूर, कामगार म्हणून काम करणाºया गावातील काही कलाकारांना सोंगी भजन, कीर्तन, शाहिरीच्या माध्यमातून कलेच्या सादरीकरणाला संधी दिली.
निर्माते व नाट्यलेखक सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या मंडळाने सन १९९२ मध्ये ‘अंधार’ नाटकाच्या माध्यमातून पहिल्यांदा राज्यनाट्य स्पर्धेत सादरीकरण केले. यानंतर धरणग्रस्तांचा सहभाग असलेले ‘धरणाखालच्या अंधारातून’, वगनाट्य ‘विच्छा’, ‘आषाढातील एक दिवस’ अशा नाटकांच्या स्पर्धा, तसेच व्यावसायिक ५० प्रयोग पूर्ण केले. ‘सासू ४२०’, ‘विठो रखुमाय’, आदी नाटकांच्या माध्यमातून हे मंडळ नावलौकिकास आले. मंडळाच्या वाटचालीत ‘कथा नामा जोग्याची’ ही एकांकिका टर्निंग पॉइंट ठरली. भालजी पेंढारकर स्मृती चषक स्पर्धेत सादर केलेल्या या एकांकिकेला वैयक्तिक पारितोषिकासह सांघिक उपविजेतेपद मिळाले. यानंतर या एकांकिकेने कोल्हापूर, इचलकरंजी, कणकवली, कोवाड, पुणे, आदी ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये बक्षिसांची लयलूट केली. या यशातून मंडळाने देवदासी, जोगता, तृतीयपंथी यांचे जीवन समजून घेत ‘कथा नामा जोग्याची’ नाटकाने राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानंतर या नाटकावरच अवघ्या १३ दिवसांत चित्रपट साकारला. त्याला ‘झी गौरव’चे दोन पुरस्कार, विविध स्पर्धांमध्ये नामांकने मिळाली. मनोरंजनासह कौटुंबिक, सामाजिक सुधारणेची आठवण करून देणारे ‘वंदे मातरम्’ अर्थात ‘गोंधळ मांडियेला’ हे वग नाटक सादर केले. त्याला उत्कृष्ट प्रयोगासह लेखनाचे ‘झी’ कॉमेडी अवॉर्ड मिळाले. एकतर्फी प्रेमावरील ‘लव्ह इथले भयकारी’द्वारे राज्य स्पर्धा गाजविली.

सामाजिक सुधारणेचे प्रणेते म्हणून प्रसिद्ध असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणी प्रस्तापितांच्या विरोधात खूप मोठा संघर्ष करावा लागला. या प्रकरणातील महाराजांचे विचार हे आजही आपल्या समाजासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. नाटकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व परिवर्तन करण्याचा मानस असल्याचे हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले.

Web Title: Hanuman Tarun Mandal's 'Agnidi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.