Hanuman Temple: मंत्री हसन मुश्रिफांकडून हनुमान मंदिराचे लोकापर्ण, माथा टेकून घेतलं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 12:54 PM2022-04-04T12:54:23+5:302022-04-04T12:55:47+5:30
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ हे सध्या मतदारसंघात कार्यरत असून विविध कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण त्यांच्याहस्ते करण्यात येत आहे.
मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. या भाषणात शिवसेना, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला. राज यांच्या भाषणात मशिदींवर अजानच्या भोंग्याचा मुद्दाही पुढे आला. या भोंग्याशेजारील मंदिरांसमोर आम्ही हनुमान चालिसा स्पीकरद्वारे लावू, असेही राज यांनी म्हटले. राज यांच्या वक्तव्यामुळे हनुमान चालिसा आणि हनुमान मंदिर चर्चेत आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रिफ यांनी हनुमान मंदिराचे लोकापर्ण करुन त्याचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ हे सध्या मतदारसंघात कार्यरत असून विविध कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण त्यांच्याहस्ते करण्यात येत आहे. सध्या राज ठाकरेंनी हनुमान चालिसा लावू, असे म्हणत मशिदींवरील भोंगे (स्पीकर) हटविण्याची मागणी केली आहे. त्यातच, मंत्री हसन मुश्रिफ यांनी गडहिंग्लज येथे हनुमान मंदिराचे लोकार्पण केल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी या मंदिराचे लोकार्पण करुन, हनुमानचरणी माथा टेकला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे हनुमान मंदिराचे लोकार्पण केले. pic.twitter.com/DhxtTdXgLF
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) April 4, 2022
मुश्रिफसाहेब एका हनुमानाची शक्ती तुमच्यात आहे, पण 11 हनुमानाची शक्ती तुम्हाला मिळू दे... असा आशीर्वाद प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी मुश्रिफ यांना दिला आहे. या व्हिडिओत मंदिर दर्शनाचा तो क्षण दिसून येत आहे.
दरम्यान, आपल्या जवळपास एक तासाच्या भाषणात राज यांनी अनेक मुद्द्यांवरुन राज्य सरकारला लक्ष्य केलं. त्यामध्ये, मशिदींवर लागणाऱ्या अजानच्या भोंग्यालाही त्यांनी विरोध दर्शवला. तसेच, हे भोंगे बंद न केल्यास शेजारील मंदिरांवर स्पीकर लावून हनुमान चालिसा वाजविण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले.