सत्कार्याची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:28 AM2019-02-11T00:28:07+5:302019-02-11T00:28:12+5:30
इंद्रजित देशमुख युवा हृदय संमेलन संपले. अनेक तरुण मित्रांचे फोन आले आणि या शिबिरांतून मिळालेल्या प्रेरणांविषयी ते भरभरून बोलत ...
इंद्रजित देशमुख
युवा हृदय संमेलन संपले. अनेक तरुण मित्रांचे फोन आले आणि या शिबिरांतून मिळालेल्या प्रेरणांविषयी ते भरभरून बोलत राहिले. शिबिराचे कवित्व संपले होते आणि एक दिवस, एक तरुण मित्राला शिबिरातल्या तीन दिवसांच्या सहजीवनातून सुबोध झाला होता. त्याच्या वास्तव जीवनामध्ये जो परिणाम दिसून आला त्याविषयी तो आपला अनुभव सांगत होता. आपल्या कºहाड तालुक्यातील पाडळी या गावातून तो मुंबईसाठी प्रवासाला रवाना झाला होता. एस.टी.च्या प्रवासाचे काही अंतर संपल्यानंतर एस.टी.चा टायर फुटला. फुटलेला टायर बदलण्यासाठी ड्रायव्हर आणि कंडक्टरची लगबग सुरू झाली. कंडक्टरच्या हाताला मार लागला होता. त्यामुळे एकटा ड्रायव्हर धडपडत होता. हा मंगेश जाधव नावाचा तरुण मित्र एकट्या ड्रायव्हरची धडपड बघून खाली उतरला आणि ड्रायव्हरला सर्वतोपरी मदत तो करू लागला. त्याची ही धडपड प्रवाशांमध्ये असलेल्या एका फौजीने बघितली. तोही खाली उतरला. त्याने एस.टी.त बसलेल्या सर्व प्रवाशांना खाली उतरविले आणि मंगेशविषयी त्यांना पाच मिनिटांचे भाषण दिले. त्या भाषणाचा सारांश असा होता की, ‘आपण सगळेच प्रवास करत होतो. सगळ्यांनी तिकिटाचे पैसे दिले आहेत; पण ड्रायव्हरचे सुरू असलेले हाल पाहून एकटा मंगेश खाली उतरतो आणि ड्रायव्हरला त्याच्या कामासाठी काही मदत करतो. या त्याच्या सद्गुणासाठी आणि छोट्याशा कार्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवूया.’ मंगेश फोनवरून सांगत राहतो की, माझ्या आयुष्यात आज मला कुणीतरी पहिल्यांदा माझ्या चांगल्या कामासाठी टाळ्या वाजविल्या. एका छोट्याशा चांगल्या कामाला त्याला जी दाद मिळाली त्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता. आपले जीवन सार्थकी झाले आहे, असे त्याला वाटत होते. असेही जगल्यानंतर आपल्याला कळेल आम्ही अशा व्यक्तींसाठी काम करू ती व्यक्ती की, ज्याची आमची कोणती ओळख नाही आणि आम्ही त्यांच्यासाठी काम केले तर ते परतफेड करू शकणार नाहीत. दररोज एक जरी काम अशा स्वरूपाचे झाले तरी आमचा आजचा दिवस धन्य होईल. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर असे म्हणतात की, आयुष्यातील सर्वाधिक सातत्यपूर्ण आणि तातडीचा प्रश्न म्हणजे तुम्ही इतरांसाठी काय केले. या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे रोज असायला हवे. तुम्हाला भेटलेली प्रत्येक व्यक्ती अधिक चांगली आणि आनंदी झाल्याशिवाय परतणार नाही. एवढी काळजी घेतली तरी जीवनातली सकारात्मकता वाढत राहील.
मला माझ्या आयुष्यात खूप महान सत्कार्य करण्याची इच्छा आहे. मात्र, मी माझ्यासमोर आलेले एखादे छोटेसे कार्यसुद्धा मी जर महान समजून केले तर ते कार्यही महानच असते. रस्त्यावरून चालत असताना एखाद्या अनोळखी माणसाकडे पाहून स्मित हास्य करणे. एखादा हमाल चढावर गाडा ढकलत असताना घामेघूम झाला आहे. त्याच्या हातगाड्याला हातभार लावून पठारापर्यंत पोहोचवून बाजूला होणे. विक्री केंद्रावरील कर्मचाऱ्याचे आभार मानणे. तुमचा एखादा शब्द, तुमची एखादी कृती, तुमचा एखादा स्पर्श एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर त्या क्षणापुरता हा बदल करू शकत असेल, त्याला आनंद देऊ शकत असेल, तर अशा कृती वारंवार करणे उचित होय. या गोष्टी माणसाला यशस्वी करतील की नाही माहीत नाही; पण गुणवान होण्यासाठी नक्की मदत करतील. भरभरून जगण्यातला आनंद बहाल करतील. निसर्गाने कशी व्यवस्था केली आहे. एखादं चांगलं काम केलं तर छाती आपोआप भरून येते. ‘उभारूनी पाहे। विठू पालवित आहे।।’ याप्रमाणे ऊर भरून येणारी क्रिया आमच्या हातून घडावी. एखादी कृती केल्यानंतर जर ऊर दबून जात असेल तर ती न करावी. आपल्या अनेक कृतींच्यासाठी विश्वाच्या पोकळीत कोणीतरी नक्कीच टाळी वाजवत आहे आणि ती टाळी माझ्या पुढच्या जगण्याला प्रेरणा देत आहे. इतकेच नाही तर माझा अखंड आयुष्याचा प्रवास ज्या वेळेला संपेल त्या वेळेला माझ्याविषयी लोकांनी कृतार्थतेचे उद्गार काढायला हवेत. ‘तो फक्त श्रीमंत होऊनच मरून गेला,’ असे उद्गार निघण्याऐवजी ‘तो खूप उपयोगी आयुष्य जगला’, असे उद्गार माझ्याविषयी निघतील तर माझे जीवन धन्य झाले असेल. मंगेशच्या ऊरामध्ये या छोट्याशा कार्याची प्रज्वलित झालेली जी ठिणगी आहे तिची त्याच्या आयुष्यामध्ये भविष्यात मशाल बनावी आणि इतरांना त्या प्रकाशात चालण्याची प्रेरणा मिळावी. ‘वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार। होती उपकार अगणित।।’ अशा प्रकाशाची पाऊलवाट प्रत्येकाला मिळावी. ही सद्भावना हजारो मैलांचा प्रवास एका लहानशा पावलाने सुरू होतो. लहानसहान क्षणापासूनच भविष्यातील मोठ्या सत्कार्याची निर्मिती होत असते. अशा छोट्या-छोट्या कृतींची सवय झाली की, भविष्य प्रकाशात आणि आनंदात कृतार्थ आणि यथार्थपणे जगता येते.
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)