मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:46 PM2020-02-21T14:46:15+5:302020-02-21T14:47:47+5:30
‘जागा झालाय समाज आज, मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं’, ‘ माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’, अशा गीतांचे सादरीकरण करीत शाहिरांनी शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘थाप डफावर मार शाहिरा’ कार्यक्रमात रंगत आणली.
कोल्हापूर : ‘जागा झालाय समाज आज, मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं’, ‘ माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’, अशा गीतांचे सादरीकरण करीत शाहिरांनी शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘थाप डफावर मार शाहिरा’ कार्यक्रमात रंगत आणली.
राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि विद्यापीठातील अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये आयोजित शाहिरी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी हा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव विलास नांदवडेकर, शाहीर राजू राऊत प्रमुख उपस्थित होते.
सहभागी प्रशिक्षणार्थींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह लोकनायकांना नमन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. गायक राजू नदाफ याने ‘मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून’ हे गीत सादर केले. प्रशिक्षणार्थी महेश सोनुले आणि सहकाऱ्यांनी ‘माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ हे गीत सादर करून शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरीस मुजरा केला.
शाहीर भारती कोळेकर आणि सहकाऱ्यांनी ‘जागा झालाय समाज आज, मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं’ हे, तर शाहीर माधवी काटकर यांनी ‘वीर मर्द झाशी की राणी’ हा पोवाडा सादर केला. यावेळी भेदिक शाहिरी, शिवरायांचा गोंधळ, महाराष्ट्राचे शाहीर आम्ही व जग बदल घालुनी घाव, आदी पोवाड्यांचे सादरीकरण झाले. याप्रसंगी कलावंत, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.
शाहिरी कलेचे मोठे योगदान
महाराष्ट्राला शाहिरीची प्राचीन परंपरा आहे. शाहिरी कला ही मानवी जीवनात रसनिर्मितीचे सामर्थ्य निर्माण करते. प्रबोधनात्मक परंपरेचा वारसा जिवंत ठेवण्यात शाहिरी कलेने मोठे योगदान दिले असून, ही कला जोपासणे ही काळाची गरज असल्याची भावना डॉ. शिर्के यांनी केली.