हद्दवाढीला शुभेच्छा, पण पाठिंबा नाही : पी. एन. पाटील
By admin | Published: June 27, 2015 12:47 AM2015-06-27T00:47:34+5:302015-06-27T00:55:34+5:30
हद्दवाढ प्रश्न : कृती समितीने घेतली भेट; मंजूर करून आणल्यास विरोध न करण्याची भूमिका
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीला आपण फक्त शुभेच्छा देऊ शकतो, पाठिंबा नाही, असे स्पष्टीकरण कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी शुक्रवारी येथे दिले. सरकार आमचे नाही, त्यामुळे सध्याच्या सरकारकडून समितीने हद्दवाढ करून आणल्यास त्याला आपला विरोध असण्याचे कारण असणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
शाहूपुरी येथील श्रीपतरावदादा बोंद्रे बॅँकेत शहर हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार व उपमहापौर मोहन गोंजारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पी. एन. पाटील यांची भेट घेऊन हद्दवाढीला पाठिंबा देण्याची विनंती केली. यावेळी ते बोलत होते.
पी. एन. पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील लोक आहे तो फाळा भरू शकत नाहीत. त्यातच ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, गटारी अशा सुविधा त्यांना ग्रामविकास, तसेच खासदार, आमदारांच्या निधीतून मिळतात. त्यामुळे हद्दवाढ झाल्याने त्यांची अडचण होऊ शकते. एक किलोमीटरच्या परिघातील गावे हद्दवाढीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, यामध्ये आपल्या मतदारसंघातील गावे येत असल्यास ती वगळून हद्दवाढ केल्यास आपली हरकत नाही. कॉँग्रेसचे सरकार असताना दोनवेळा आपण हद्दवाढीला स्थगिती आणली होती. परंतु, आता सरकार आमचे नसल्याने त्यांचे हात आम्ही धरू शकत नाही. त्यामुळे कृती समितीला आता संधी आहे. त्यांनी त्यांच्याकडून हद्दवाढ मंजूर करून आणल्यास आपला विरोध असणार नाही. हद्दवाढीस आपल्या शुभेच्छा असतील, पण पाठिंबा नाही.
आर. के. पोवार म्हणाले, पी. एन. पाटील नेतृत्व करत असलेल्या गावांचा समावेश हद्दवाढीत आहे. त्यामुळे त्यांनी तेथील लोकांचा गैरसमज दूर करून हद्दवाढीला पाठिंबा द्यावा. ग्रामीण भागातील लोकांना दुखावण्याचा आमचा हेतू नसून त्यांचा विकास व्हावा, ही आमची भावना आहे.माजी महापौर महादेवराव आडगुळे म्हणाले, पी. एन. पाटील यांनी ग्रामीण व शहर यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावावी. हद्दवाढीसाठी त्यांच्याकडे आमचा हट्ट असून, त्यांनी सहकार्य करावे. वडीलकीच्या नात्याने त्यांनी लोकांचे मतपरिवर्तन करावे.
नगरसेवक राजू लाटकर म्हणाले, ग्रामीण जनतेत हद्दवाढीसंदर्भातील असणारी अनाठायी भीती पी. एन. पाटील यांनी दूर करावी. त्यांच्यासह माजी मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. चंद्रदीप नरके, आ. महादेवराव महाडिक अशा नेत्यांनी एकत्र येऊन येत्या आठ दिवसांत राजकारणविरहित एकोप्याची बैठक घ्यावी.
महापालिका स्थायी समिती सभापती आदिल फरास म्हणाले, पी. एन. पाटील यांनी फक्त डरकाळी फोडून ग्रामीण जनतेची समजूत घातल्यास हद्दवाढीला कसलीच अडचण येणार नाही.
कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण म्हणाले, निवडणुकीपूर्वी आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने हद्दवाढीची तत्काळ अधिसूचना काढली पाहिजे. शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय निधी मिळणार नसल्याने पी. एन. पाटील यांनी हद्दवाढीच्या मागे राहावे.
भाकपचे नेते दिलीप पवार म्हणाले, हद्दवाढ झाल्यावर ग्रामीण भागाचा उत्कर्ष झाल्याचा इतिहास इतर महापालिकांवरून दिसत आहे. त्यामुळे याचा सकारात्मकरीत्या विचार व्हावा. सरकारने सांगितल्याप्रमाणे हद्दवाढ करावी.
राष्ट्रवादी सेवा दलाचे अनिल घाटगे म्हणाले, जिल्ह्णाचे नेते म्हणून पी. एन. पाटील यांनी युधिष्ठिराची भूमिका बजावावी. त्यांनी फक्त ग्रामीण भागाचा विचार करून चालणार नाही. त्यांनी आमच्या भावनांचा आदर करावा, कारण ते सर्वांचे नेते आहेत.
यावेळी महापालिका महिला व बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ, परिवहन समिती सभापती अजित पोवार, नगरसेवक संजय मोहिते, माजी महापौर मारुतराव कातवरे, अशोक पोवार, बाबा पार्टे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कृती समितीची आज पालकमंत्र्यांबरोबर चर्चा
शहर हद्दवाढीच्या समर्थनार्थ हद्दवाढ कृती समितीच्यावतीने जिल्ह्यातील नेत्यांची भेट घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज, शनिवारी समितीतर्फे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक होणार असून, यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.