हापूस पेटी साडेअकरा हजारांवर
By admin | Published: January 31, 2016 01:12 AM2016-01-31T01:12:39+5:302016-01-31T01:44:23+5:30
बाजार समितीत सौदा : नवीन आंब्यांची आवक
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत नवीन हापूस आंब्यांची आवक सुरू झाली आहे. शनिवारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्या हस्ते मुहूर्ताचा सौदा काढण्यात आला, या सौद्यात पेटीचा दर साडेअकरा हजार रुपये झाला.
बाजार समितीच्या फळे मार्केटमधील दस्तगीर मकबूलभाई बागवान यांच्या अडत दुकानात उमेश तेली (देवगड) व सलीम काझी (पावस) यांच्या हापूस आंब्याची आवक झाली होती. नवीन आवक झाल्याने हापूस आंब्याचा सौदा जिल्हा उपनिबंधक काकडे यांच्या हस्ते मुहूर्तावर काढला. यात चार डझनाची पेटी सोलापूरचे ग्राहक बकालू यांनी ११ हजार ५०० रुपयांना खरेदी केली.
या सौद्यात अन्य पेटीचा दर कमीत कमी ५ हजार ५०० रुपये राहिला. त्याचबरोबर एक ते दीड डझन बॉक्सचा दर १५०० ते २५०० रुपयांपर्यंत राहिला. यावेळी समितीचे सभापती परशराम खुडे, उपसभापती विलास साठे, संचालक नंदकुमार वळंजू, दशरथ माने, सचिव विजय नायकल, संचालक, अधिकारी, शेतकरी, व्यापारी, अडते उपस्थित होते. (प्रतिनिधी)