कोल्हापूरात हापूसची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:59+5:302021-04-29T04:18:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात हापूस आंब्याची आवक वाढली असून रोज बाजार समितीत १२ हजार बॉक्स तर सहाशेहून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात हापूस आंब्याची आवक वाढली असून रोज बाजार समितीत १२ हजार बॉक्स तर सहाशेहून अधिक पेट्यांची आवक होते. गेल्या आठवड्यापेक्षा चार हजार बॉक्सची आवक जादा दिसते. त्यामुळे दरात पेटीमागे ६५० रुपये तर बॉक्स मागे १५० रूपयांची घसरण दिसते.
काेल्हापुरात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कर्नाटकातून हापूस आंब्याची आवक होते. यंदा अवकाळी पाऊस, खराब हवामानामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. एप्रिल आला तरी अपेक्षित आवक नसल्याने यंदा आंब्याचे दर चढेच राहिले. एप्रिल संपत आला तरी पेटीचा दर सरासरी २७५० रुपये तर बॉक्स ६०० रुपयांपर्यंत राहिला. त्यामुळे सामान्य माणसाला यंदा हापूसची चव चाखायला मिळणार का? असे वाटत होते. मात्र, बुधवारपासून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत हापसूची आवक वाढू लागली आहे. हापूस आंब्याचे १० हजार ४६३ तर पायरी व लालबागच असे एकूण १२ हजार बॉक्सची आवक होते. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात घसरण झाली आहे. पेटीमागे ६५० रुपये तर बॉक्समागे १५० रुपये कमी झाल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
महिनाभरच राहणार आवक
साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक कायम राहते. मात्र यावेळेला परिस्थिती काहीशी वेगळी असून २० एप्रिल ते २० मे या कालावधीतच आवक वाढलेली दिसेल, त्यानंतर कमी होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
गेल्यावर्षीपेक्षा आवक कमीच
गेल्यावर्षी एप्रिलच्या अखेरला बाजार समितीत रोज सरासरी १४ हजार बॉक्सची आवक व्हायची. त्या तुलनेत यंदा आवक कमीच आहे. खराब हवामानाचा फटका बसल्याने परिणाम झाला आहे.
कोट-
हापूसची आवक वाढू लागल्याने दरात थोडी घसरण झाली आहे. त्यात विक्रीवर वेळेचे बंधन आल्याने उठाव होत नाही. यासाठी सकाळी सहा ते दहा खरेदी वेळ व अकरा ते एक विक्रीसाठी वेळ दिली पाहिजे.
- सलीम बागवान (फळ व्यापारी)
आठवड्यातील तुलनात्मक दरदाम रुपयात असा
आंबा २१ एप्रिल आवक सरासरी दर २८ एप्रिल आवक सरासरी दर
हापूस ३०८ पेटी २७५० ४३५ २१००
हापूस ६८५० बॉक्स ६०० १०४६ ४५०
पायरी ३६५ बॉक्स ३२५ ६७० २८५
लालबाग १००० बॉक्स १४० १६०० बॉक्स ८०
फोटो ओळी : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी हापूस आंब्याची आवक वाढली होती. (फाेटो-२८०४२०२१-कोल-मँगो) (छाया- आदित्य वेल्हाळ)