Kolhapur: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ करून आर्थिक लबाडणूक; कळंब्यातील तरुणावर गुन्हा
By उद्धव गोडसे | Updated: March 25, 2024 12:55 IST2024-03-25T12:54:45+5:302024-03-25T12:55:52+5:30
वधू-वर सूचक साईटवरुन झाली होती ओळख

Kolhapur: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ करून आर्थिक लबाडणूक; कळंब्यातील तरुणावर गुन्हा
कोल्हापूर : वधू-वर सूचक साईटवर झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सुमारे तीन लाख रुपये उकळले. त्यानंतर पैशांसाठी धमकावून बदनामी करण्याची भीती घातली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार करवीर पोलिसांनी अमोल विनायक कांबळे (रा. जुना नाका, कळंबा, ता. करवीर) याच्यावर गुन्हा दाखल केला.
करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि संशयित आरोपी अमोल कांबळे या दोघांची वधू-वर सूचक साईटवर ओळख झाली. 'माझा घटस्फोट होणार असल्याने आपण लग्न करू,' असे आमिष कांबळे याने तरुणीला दाखवले. त्यानंतर कोल्हापुरात बोलवून घेऊन वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. गुंगीचे औषध देऊन तिचे अश्लील फोटो, व्हिडिओ तयार केले. त्यानंतर तिच्याकडून पैशांची मागणी सुरू केली. फोन पेवर ८६ हजार रुपये घेतल्यानंतर पाच लाख रुपयांची मागणी केली. बदनामीला घाबरून पीडित तरुणीने दोन लाख रुपये दिले.
मात्र, त्यानंतरही आणखी पैशांसाठी कांबळे याने तिला आयुष्य बरबाद करण्याची आणि मारून टाकण्याची भीती घातली. सप्टेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात झालेल्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. संशयित कांबळे याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.