हरिश्चंद्राचा नव्हे भाजपचा जमाना
By admin | Published: December 7, 2015 12:13 AM2015-12-07T00:13:50+5:302015-12-07T00:20:51+5:30
राजू शेट्टींची उद्विग्नता : मंत्रिमंडळ विस्ताराचा चाप्टर ६ महिन्यांपूर्वीच बंद
कोल्हापूर : हरिशचंद्राच्या राज्यात स्वप्नातील ही खरे व्हायचे पण आता तर भाजपचे सरकार आहे, हरिशचंद्राचे नव्हे, अशी उद्विग्नता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मंत्रिमंडळ विस्ताराचा चाप्टर आपल्या पातळीवर सहा महिन्यांपूर्वीच बंद केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकरकमी एफआरपी व आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. खासदार राजू शेट्टी म्हणाले, हा विषय माझ्या पातळीवर सहा महिन्यांपूर्वीच बंद झाला आहे. त्यावर आता काही बोलणार नाही; पण एवढे सांगावेसे वाटते, पूर्वी हरिशचंद्राच्या राज्यात स्वप्नातील गोष्ट ही खरी व्हायची, पण भाजप सरकारच्या जमान्यात दिवसा-ढवळ्या दिलेल्या वचन पाळले जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री अथवा पंतप्रधानाशी बोलणार नाही, माझ्यादृष्टीने ऊसदराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्यांनी कारखानदारी मोडीत काढली, त्यांनाच सोबत घेऊन भाजप सरकार काम करत आहे. सरकार आमचे पण सल्ला देणारे गडी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे आहेत. आम्ही मात्र दाराबाहेर असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विधानपरिषदेत पत्ते खुले
राज्याच्या राजकारणात भाजप आमचा जवळचा मित्र आहे. भाजपने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांचा उमेदवार नसेल तर आमचे पत्ते खुले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
सरकारकडून शेतकऱ्यांचा अनादर
भ्रष्टाचारी कारखानदारांची चौकशी लावून त्यांच्या हातात बेड्या ठोकतील म्हणून शेतकऱ्यांनी मतपेटीद्वारे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील संताप व्यक्त केला; पण सध्या सरकारच्या हालचाली पाहता शेतकऱ्यांच्या मतांचा अनादर सुरू असल्याची टीका शेट्टी यांनी केली.
सदाभाऊंचे तोंडावर बोट
ऊसदर आंदोलनाबाबत संपूर्ण माहिती शेट्टी यांनीच सांगितली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सदाभाऊ खोत यांना विचारले असता, त्यांनी तोंडावर बोट ठेवत शेट्टींकडे बोट केले.