हणमंतवाडीत महिला सदस्यास मारहाण
By admin | Published: November 1, 2015 12:37 AM2015-11-01T00:37:06+5:302015-11-01T00:59:01+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद : चौघांवर गुन्हा; एकास अटक
कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील व शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके या दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांच्या वतीने परस्पर विरोधी फिर्यादी करवीर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या.
दरम्यान, महिला सदस्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी संशयित आरोपी रामदास बाबूराव पिंजरे (वय ३०) याला करवीर पोलिसांनी अटक केली.
हणमंतवाडी ग्रामपंचायतीमध्ये आमदार नरके गटाचे कार्यकर्ते रामदास पिंजरे यांची सत्ता आहे. ग्रामपंचायत पेयजल योजनेमध्ये घोटाळा झाल्याने माजी आमदार पी. एन. पाटील गटाच्या महिला सदस्याने माहिती अधिकाराखाली माहिती मागविली होती. याचा राग रामदास पिंजरे यांच्या मनात होता.
संबंधित महिला सदस्या शनिवारी दुपारी घरासमोर एकट्याच उभ्या असताना संशयित रामदास पिंजरे, श्रेयस संभाजी पिंजरे, प्रणव प्रल्हाद पिंजरे, एकनाथ बाबूराव पिंजरे हे हातामध्ये तलवारी घेऊन आले. यावेळी रामदास व श्रेयस पिंजरे यांनी संबंधित महिलेला शिवीगाळ करीत तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दारात लावलेल्या दुचाकीची तोडफोड केली.
याप्रकरणी महिलेने फिर्याद दिल्याने वरील चौघाजणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये रामदास पिंजरे याला अटक केली. त्याचबरोबर रामदास याने दिलेल्या फिर्यादीनुसार सुजित बाबूराव पिंजरे यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे करीत आहेत. (प्रतिनिधी)