कष्टकऱ्यांची वादळी चळवळ उभारणार

By Admin | Published: December 27, 2014 12:31 AM2014-12-27T00:31:27+5:302014-12-27T00:34:50+5:30

भारत पाटणकर : आजऱ्यात श्रमिक मुक्ती दलाचे १८ वे राज्यस्तरीय अधिवेशन

The harsh movement of workers will be raised | कष्टकऱ्यांची वादळी चळवळ उभारणार

कष्टकऱ्यांची वादळी चळवळ उभारणार

googlenewsNext

आजरा : जातीयवाद व धर्मांधतेचा अर्क असणारी मंडळी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पायदळी तुडवत ‘अच्छे दिन’ची घोषणा करीत महाराष्ट्रासह देशात सत्तेवर आली आहे. विकासाची चर्चा दूरच ठेवत नथुराम गोडसे आणि धर्मांतर याचीच चर्चा घडवून आणली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पातळीवर कष्टकऱ्यांची वादळी चळवळ उभी करण्याचा निर्णय घेण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे अधिवेशन बोलविले आहे, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
चित्रानगर (आजरा) येथे आयोजित १८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. श्रमिक मुक्ती दलाचे घोषणा देणारे कार्यकर्ते, भजनी मंडळे, सजवलेल्या बैलगाड्यांमध्ये असणारे डॉ. पाटणकर, महात्मा फुले, संत गाडगेबाबा यांच्या वेशातील डॉ. नवनाथ शिंदे, नारायण भडांगे मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते.
डॉ. पाटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. गेल अ‍ॅम्व्हेट व इंदुताई पाटणकर यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, आदींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
डॉ. पाटणकर म्हणाले, श्रमुदच्या माध्यमातून ३४ वर्षे कष्टकऱ्यांचे लढे उभारले गेले. केवळ वैचारिक मांडणी करून समाज बदलत नाही. विचार अमलात आणण्याची गरज आहे. जी माणसे काम केल्याशिवाय व घाम गाळल्याशिवाय जगू शकत नाहीत, अशा मंडळींच्या पाठबळावर संघटनेची वाटचाल सुरू आहे. गौतमबुद्धांपासून ते कार्ल मार्क्सपर्यंत क्रांतिकारी विचार देणाऱ्यांच्या विचारावर शाश्वत व पर्यावरण संतुलित विकास घडविण्यासाठी संघटना बांधील आहे, असेही स्पष्ट केले.
राज्य संघटक संपत देसाई म्हणाले, स्वत:च्या प्रश्नावर लढत लढत वैचारिक बैठक निर्माण करणाऱ्यांची ही संघटना आहे. कष्टकऱ्यांना ऊर्जा देण्यासाठी अधिवेशन गरजेचे आहे. राज्यभरातील मान्यवरांशी संवाद साधल्यानंतर विचारांना दिशा मिळण्याचे काम होते. अधिवेशनामध्ये कष्टकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ठोस भूमिका मांडली जाणार आहे. यावेळी वाहरू सोनवणे, अ‍ॅड. कृष्णा पाटील (तासगाव), दिलीप पाटील (कऱ्हाड), उत्तमराव भुजबळ, प्रकाश मोरूसकर, गणपतराव घागरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The harsh movement of workers will be raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.