मराठा आरक्षणासंबंधी हरिष साळवे मांडणार बाजू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:22 AM2018-12-04T05:22:00+5:302018-12-04T05:22:16+5:30
मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
कोल्हापूर : मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री व राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह १२ जण विशेष विमानाने शुक्रवारी दिल्लीला जाणार असून तेथे प्रख्यात विधीज्ञ हरिष साळवे व कुंभकोणी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.
स्वत: पाटील यांनीच ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. मंत्री पाटील म्हणाले, ‘मराठा आरक्षण लागू करताना कोणत्याही कायदेशीर त्रुटी राहू नयेत यासाठी विख्यात विधिज्ञ साळवे यांची आम्ही सुरुवातीपासूनच मदत घेतली. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष कायदा करण्याची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा अॅड. साळवे हे कौटुंबिक कामानिमित्ताने लंडनला गेले होते. सरकारकडून कायद्याचा मसुदा घेवून तीनवेळा वरिष्ठ अधिकारी लंडनमध्ये पाठविण्यात आला. त्यांनी दुरुस्त्या केल्यानंतरच कायद्याला अंतिम स्वरुप देण्यात आले.