बस्तवडेतील हर्षवर्धन भोसलेचा ‘एनडीए’त डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:23 AM2021-03-15T04:23:36+5:302021-03-15T04:23:36+5:30
म्हाकवे : बस्तवडे (ता. कागल) येथील हर्षवर्धन शैलेश भोसले याची राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएसाठी निवड झाली आहे. ...
म्हाकवे : बस्तवडे (ता. कागल) येथील हर्षवर्धन शैलेश भोसले याची राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएसाठी निवड झाली आहे. यूपीएससीमार्फत घेतलेल्या या परीक्षेस तब्बल 8 लाख विद्यार्थ्यांतून 350 उमेदवार पात्र ठरले. यामध्ये अजितने 107 वा क्रमांक पटकावीत घरच्या व गावच्या लष्करी परंपरेला उजाळा दिला आहे. सध्या तो पाचगाव येथे राहत आहे.
विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ७ वीमध्ये शिकत असताना राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून (उत्तराखंड) साठीची कठीण अशी प्रवेश परीक्षा दिली. यामध्ये तो महाराष्ट्रातून एकमेव पात्र ठरला होता. याच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये 8 वी ते 12 वी शिक्षण व त्याचवेळी लष्करी पार्श्वभूमीचे काटेकोर प्रशिक्षण घेत त्याने यूपीएससीची एनडीए परीक्षेची तयारी केली. कै. कॅप्टन तुकाराम विष्णू भोसले, एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांची घरची लष्करी परंपरा त्याने जपली आहे. प्रख्यात अवकाश संशोधक कै. आर.व्ही. भोसले यांचा तो पणतू व शासकीय लेखापरीक्षक एम.एस. भोसले यांचा तो नातू आहे.
हर्षवर्धनचे वडील शैलेश भोसले हे कोल्हापूर अर्बन बँकेत कॅशिअर म्हणून कार्यरत आहेत. एनडीएच्या खडकवासला कॉलेजमध्ये तीन वर्षे त्याचे प्रशिक्षण होईल.
त्याला इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूलचे संभाजी साठे, मावशी सौ. मीना देसाई, काका सुहास देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.