हेरवाडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:31 AM2018-10-04T00:31:01+5:302018-10-04T00:31:05+5:30
कुरूंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील संजय भगवान गोंधळी (वय ४२) या शेतकºयाने कर्जास कंटाळून रामलिंग डोंगर (ता. हातकणंगले) येथे मंगळवारी (दि.२) रात्री विष पिऊन आत्महत्या केली.
संजय गोंधळी यांची हेरवाड येथे दीड एकर शेती आहे. पत्नी, दोन मुले व आईसोबत कौलारू घरात राहतात. शेतात ऊस पीकच असल्याने व उत्पादन खर्च वाढल्याने शेती तोट्यातच होती. यातून त्यांनी २० गुंठे शेती दीड लाख रुपयांवर गहाणवट ठेवली आहे. एक एकर शेतीवर गावातील सेवा सोसायटीचे ९६ हजार, बॅँकेचे ५० हजार, बचतगटाचे ३० हजार याशिवाय हातउसने असे सुमारे चार लाखापर्यंत कर्ज होते.हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत काही दिवस संजय अस्वस्थ होते. सोमवारी (दि. १ आॅक्टोबर) ते मोटारसायकल घेऊन घरातून बाहेर पडले होते. मंगळवारी (दि.२) रात्री रामलिंग डोंगरावर विष पिऊन त्यांनी आत्महत्या केली.
पंधरा दिवसांपूर्वीच चिपरी (ता. शिरोळ) येथील तरुण शेतकरी राजेंद्र जिन्नाप्पा कोरे (३६) यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली होती. शिरोळ तालुका सधन असूनही शेतीच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी बनत आहेत. शासनाच्या चुकीच्या कृषी धोरणाविरुद्ध शेतकºयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
उसाला चांगला दर मिळत असला तरी उत्पादनखर्च वाढला आहे. त्यामुळे ऊस शेतीही तोट्यात आहे. फळे, फुले, भाजीपाला, फळभाज्यांनाही दर नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत अडकत आहे. यातूनच शिरोळ तालुक्यातील शेतकरी आत्महत्या करीत असून, आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे शासनाने कर्ज माफ करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी.
- बंडू पाटील, तालुकाध्यक्ष,
स्वाभिमानी युवा आघाडी.