घडलंय, बिघडलंय -
By admin | Published: January 24, 2017 12:22 AM2017-01-24T00:22:00+5:302017-01-24T00:22:00+5:30
सिटी टॉक
समाजात काही माणसं तत्त्वनिष्ठ असतात. तत्त्वनिष्ठा, नीतिमूल्ये जपण्याकरिता ही माणसं त्याग करण्यास सदैव तयार असतात; पण कधीही तडजोड करत नाहीत. लोक त्यांना बऱ्याचवेळा वेड्यात काढतात, पण नाही, ही माणसं तत्त्व सोडत नाहीत, समोर मोठी आमिषे असली तरीही! लोक काहीही म्हणोत. चारित्र्याला कधीही तडा जाऊ नये, लोकांचा आपल्यावरील विश्वास उडू नये असंच यांना मनोमन वाटत राहतं, म्हणूनच त्याच मार्गाने त्यांचं जीवन व्यतीत करणं सुरू असतं; परंतु अशी माणसं आता फारच कमी होत चालली आहेत. अगदी हजारात एखादच म्हणा ना! त्यातल्या त्यात जुन्या विचारांची माणसं आज पाहायला मिळतात, पण अलीकडील पिढीतील तत्त्वनिष्ठ, नीतिमूल्य हा शब्दकोशच नाहीसा होतो की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे.
आज ही तत्त्वं, नीतिमूल्ये आठवायचं कारण म्हणजे सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका हे आहे. निवडणुका आल्या की, एका गाठोड्यात ही सर्व गोंडस नावं गुंडाळून ठेवली जातात. ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षाची उमेदवारी मागताना ‘बायोडेटा’मध्ये मात्र ठळक अक्षरात लिहिलेलं असतं .. पक्षाशी एकनिष्ठ व प्रामाणिक! पुढे चार दिवसांत उमेदवारी मिळाली नाही की, त्यांचा हा एकनिष्ठपणा कुठे जातो, हे मतदारांनाच नाही तर त्यांचं त्यांनाही कळत नाही. काही नेते असे असतात की, त्यांना नेहमी सत्तेशी सोयरीक करायला आवडतं. कोल्हापूर जिल्ह्यानं सन १९९५ला जे चित्र पाहिलं होतं तेच आता सन २०१७ मध्ये बारा वर्षांनी पाहायला मिळतंय. सत्तेतील पक्षाबरोबर जायला नेत्यांमध्ये चढाओढ आहे. प्रवाहाबरोबर झुलणाऱ्यांची संख्या अधिक दिसायला लागलीय आणि त्याला खतपाणी घालायला, साधनसामग्री पुरवायला राज्यकर्तेही उत्सुक असल्याचे दिसून येत आहेत.
कोल्हापुरातील माजी महापौर बाबू फरास यांचे वडील कै. हारुण फरास हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. उभी हयात ‘शेकाप’मध्ये गेली; परंतु चिरंजीव बाबू फरास काही त्यांच्या तत्त्वांशी बांधील नव्हते. ‘शेकाप’ला भविष्य नसल्याची धारणा झालेल्या बाबूंनी काँग्रेसबरोबर काम करण्यास सुरुवात केली. पुढे बाबू फरासांचे चिरंजीव आदिल राजकारणात आले. त्यांनी सन २००५ मध्ये महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. त्यांच्या विरोधात त्यावेळी ‘शेकाप’चा एक उमेदवार निवडणूक लढवत होता. आदिल फरास यांच्या प्रचारकार्यात त्यांचे आजोबा हारुण फरास सहभागी होतील हे साहजिकच होते. नातू निवडून आला पाहिजे ही कोणत्याही आजोबाची भावना असणारच, पण कुठले काय, हारुण फरास यांनी त्यांच्या नातवापेक्षा पक्षनिष्ठेला सर्वाधिक प्राधान्य दिले. प्रचार सुरू होताच नातवाच्या विरोधात प्रचार करणाऱ्या आजोबांना पाहून मतदारही चर्चा करायला लागले. आदिलनी विनंती करूनही ते थांबले नाहीत. एवढेच नाही, तर ‘बाळ माझं संपूर्ण आयुष्य एका विशिष्ट तत्त्वांशी बांधलं गेलेलं आहे, तुझ्या एका निवडणुकीसाठी त्यास मूठमाती देऊन माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून घेऊ का?’ असा प्रश्न केला. त्यावेळी निरुत्तर झालेल्या फरास बाप-लेकांनी त्यांना हात जोडले आणि प्रचाराला लागले. पक्षनिष्ठा म्हणावी तर यालाच!
एकदा दाजिबा देसाई निवडणुकीला उभे राहिले असताना कुटुंबप्रमुख त्यांच्या प्रचारात सहभागी होत असायचे. आळीपाळीने प्रचाराला जाताना दिवसभर फिरायला लागेल या विचारातून घरातून भाजी-भाकरी घेऊन ही मंडळी जात. दुपारच्या जेवणाची वेळ झाली, की कुठेतरी झाडाखाली बसून भाजी-भाकरी खायची आणि पुढे प्रचाराला निघायची. उमेदवार जेवण देईल, चहा-नाष्टा देईल किंवा रात्रीच्या रंगीत पार्टीची व्यवस्था करील, अशी अपेक्षा कोणी करत नव्हते. पैसे देणे-घेणे हा व्यवहार तर कोणालाच माहीत नव्हता. उदाहरणं साधी असली तरी स्वाभिमानी आहेत, पण आज नेते, उमेदवार, कार्यकर्ते, मतदार (सर्वच नव्हे) यांची काय परिस्थिती आहे ?
- भारत चव्हाण