हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे का भाऊ...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:30 AM2021-08-18T04:30:17+5:302021-08-18T04:30:17+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य ...
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक असल्याची अट आहे. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी ‘रिॲलिटी चेक’ केले असता, त्यामध्ये शहरातील विविध हॉटेल्समध्ये कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षांवरील बहुतांश कर्मचाऱ्यांचा लसीचा पहिला डोस झाला आहे. पण १८ ते ४४ वयोगटातील कर्मचारी हे लस उपलब्धतेच्या प्रतीक्षेत आहेत, असे दिसून आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असताना बहुतांश हॉटेल्स, उपाहारगृहांमध्ये पार्सल सेवा सुरू होती. शासनाने दि. १५ ऑगस्टपासून या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, उपाहारगृहांना ५० टक्के क्षमतेने रात्री दहा वाजेपर्यंत सेवा देण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार कोल्हापूरमध्ये सध्या सेवा सुरू आहे. हॉटेल क्षेत्रातील बहुतांश कर्मचारी हे १८ ते ४४ वयोगटामधील आहेत. त्यांच्या संख्येच्या तुलनेत त्यांना लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
पॉईंटर
शहरातील हॉटेल्सची संख्या : १५००
जिल्ह्यातील हॉटेल्सची संख्या : ३७००
सध्या सुरू झालेल्या हॉटेल्सची संख्या : ३३००
कर्मचाऱ्यांची एकूण संख्या : सुमारे २५ हजार
काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी!
१) लक्ष्मीपुरीतील एका हॉटेलमध्ये १८ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील ४५ वर्षांवरील ५० टक्के कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस, तर उर्वरित ४४ वयोगटातील कर्मचाऱ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे.
२) राजारामपुरी दुसरी गल्ली येथील एका हॉटेलमध्ये एकूण २५ कर्मचारी असून त्यामधील १६ जणांचे दोन्ही, तर अन्य ९ कर्मचाऱ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे.
रस्त्यांवरील टपऱ्यांवर आनंदीआनंद
शहरातील विविध परिसरातील चौक, रस्त्यांना लागून चहाच्या टपऱ्या, स्टॉल्स आहेत. तेथील ४५ वर्षांवरील बहुतांश मालकांचे लसीकरण केले आहे. ४४ वर्षांपर्यंतच्या काही कर्मचाऱ्यांचा पहिला डोस झाला असून काहीजण डोसच्या प्रतीक्षेत आहेत. हे कर्मचारी संघटित नसल्याने त्यांचे लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
प्रतिक्रिया...
कोल्हापूर शहरातील सुमारे १३०० हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरू केली आहेत. हॉटेल्समध्ये कार्यरत असणारे बहुतांश कर्मचारी १८ ते ४४ वयोगटातील आहेत. त्यातील पहिला डोस झालेल्यांचे प्रमाण कमी आहे. ४५ वर्षांवरील बहुतांश कर्मचाऱ्यांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची मागणी महापालिका, जिल्हा प्रशासनाकडे आम्ही करणार आहोत.
- उज्ज्वल नागेशकर, अध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ.