हसन मुश्रीफांनी जनतेकडे मागितली १४ दिवसांची रजा, निवासस्थानाबाहेर लावलेल्या फलकाची कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा
By समीर देशपांडे | Published: May 8, 2024 05:08 PM2024-05-08T17:08:37+5:302024-05-08T17:09:17+5:30
कोल्हापूर : महायुतीच्या जिल्ह्यातील संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या विजयासाठी गेले महिनाभर राबत असलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ...
कोल्हापूर : महायुतीच्या जिल्ह्यातील संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या विजयासाठी गेले महिनाभर राबत असलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ श्रमपरिहारासाठी १४ दिवसांच्या इटली, स्पेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी जनतेकडे १४ दिवसांची रजा मागितली असून तसा फलकही निवासस्थानाबाहेर लावला आहे. मुश्रीफ यांच्या या ‘१४ दिवसांच्या’ रजेची आता जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून मुश्रीफ यांची ओळख आहे. वैविध्यपूर्ण कल्पना राबवत जनमानसावर आपला प्रभाव पाडण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. ते कधी गांधी टोपी घालतात तर कधी कपाळाला बुक्का लावून हातात वीणा घेतात. कधी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हेलिकॉप्टरने गणपती आणतात तर कधी बुलेटवरून फेरी मारतात. आता लोकसभेसाठी मंगळवारी मतदान झाल्यानंतर मुश्रीफ यांनी या १४ दिवसांच्या रजेचा फलक लावला आहे.
त्यामध्ये त्यांनी आता महिनाभर आचारसंहिता संपेपर्यंत विविध वैयक्तिक कामांना मर्यादा आहेत. या दरम्यान १४ दिवस मी रजेवर जात असून त्यासाठी परवानगी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले आहेत. या दरम्यान आपला फोन सुरू असून भारतीय प्रमाणवेळेनुसार तेथील वेळ ही साडे तीन तास उशिरा असते. त्यामुळे अत्यावश्यकच असेल तर फोन केला तरी चालू शकेल असेही त्यांनी यामध्ये लिहले आहे. आरोग्य सेवेबाबत निवासस्थानी माझे लोक भेटतील व मुंबईची सेवाही सुरू राहिल असेही त्यांनी नमूद केले आहे.