आपत्ती रोधक घरकुलांची उभारणी करणार - हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:26 AM2021-02-24T04:26:54+5:302021-02-24T04:26:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग, आयआयटी (मुंबई), रिलायन्स फाउंडेशन आणि हुडको ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग, आयआयटी (मुंबई), रिलायन्स फाउंडेशन आणि हुडको यांच्यामध्ये भागीदारी करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केली. राज्यात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार घरकुल डिझाइन करणे, कमी खर्चातील, पण दर्जेदार अशा घरकुलाचे तंत्रज्ञान विकसित करणे, तसेच भूकंप, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करू शकणाऱ्या घरकुलांची निर्मिती करण्यासाठी आयआयटी (मुंबई) यांची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयात ग्रामविकास विभागाचे अपर सचिव राजेशकुमार, गृहनिर्माणचे संचालक डॉ. राजाराम दिघे, प्रा. प्रकाश नाथागोपालन, अभिजित ठाकरे, व्ही. टी. सुब्रह्मण्यम आदींसमवेत मंत्री मुश्रीफ यांची बैठक झाली.
आयआयटीच्या सहयोगातून राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, इंटर्नशिपच्या माध्यमातून आयआयटीमधील विद्यार्थ्यांचा ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये सहभाग घेतला जाणार आहे. हुडको (हाऊसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांच्याकडून ग्रामीण गृहनिर्माणासाठी तांत्रिक सहकार्य, तसेच सीएसआर आदी माध्यमातून आर्थिक सहकार्य घेण्यात येणार आहे. मोठ्या गावांमध्ये बहुमजली इमारती, तसेच हाऊसिंग कॉलनी आदींमध्ये सीएसआरच्या माध्यमातून मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी हुडको सहकार्य करील, तसेच कमी खर्चातील घरकुलाचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही हुडको सहकार्य करणार आहे, तर घरकुलविषयक विविध योजनांची माहिती संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थ्यांपर्यंत ऑडिओ, व्हिडिओ, तसेच टेक्स्ट मेसेजद्वारा पोहोचविण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन सहकार्य करणार आहे. एप्रिल २०२० पासून ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील ३ लाख ३७ हजार ९७८ लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी २ लाख ९८ हजार ९७ लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला असून, आतापर्यंत १ लाख ८५ हजार ३० घरे बांधून पूर्ण आहेत. उर्वरित घरांसाठी मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
गायरानमधील जागा देणार
जागा नसल्याने ७४ हजार ३७३ पात्र लाभार्थ्यांना लाभ घेता आला नाही. यासाठी गायरान, तसेच शेती महामंडळाच्या जागा घरकुल बांधकामासाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महसूलमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
फोटो ओळी : ग्रामीण घरकुल योजना बळकट करण्यासाठी मंगळवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आयआयटी (मुंबई), रिलायन्स फाउंडेशन आणि हुडकोच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. (फोटो-२३०२२०२१-कोल-ग्रामविकास)