हसन मुश्रीफ : उसाचा प्रश्न ‘हमीदवाडा’ सुरू करताना नव्हता का ?
By admin | Published: December 13, 2014 12:25 AM2014-12-13T00:25:49+5:302014-12-13T00:28:41+5:30
कारखाना मोडण्यासाठीच मंडलिकांची उठाठेव
कोल्हापूर : उसाच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला सदाशिवराव मंडलिक यांनी विरोध केला; पण यामागे ऊस व प्रदूषणाचे कोणतेच कारण नसून, उभारलेला कारखाना मोडण्यासाठीच त्यांनी न्यायालयीन उठाठेव केल्याचा आरोप संताजी घोरपडे कारखान्याचे संस्थापक, आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.
आमदार मुश्रीफ म्हणाले, कागल तालुक्यात सर्वप्रथम ‘बिद्री’ व त्यानंतर ‘छत्रपती शाहू’ सुरू झाला, त्यावेळी फक्त ८० हजार टन ऊस उपलब्ध होता. १७ वर्षांपूर्वी हमीदवाडा कारखान्याची सुरुवात केली, त्यावेळी मंडलिक यांची उपलब्ध उसाची चिंता कोठे गेली होती? सध्या कागल व सीमाभागात उसाचे क्षेत्र मुबलक आहे. तालुक्यातून दरवर्षी सात लाख टन ऊस बाहेरील कारखाने उचलतात. त्यात ‘हमीदवाडा’ने बहुराज्य करण्याचा ठराव केला असताना उसाच्या टंचाईचा प्रश्न येतोच कोठे? हमीदवाडा कारखान्याचे अधिकारी व काही बगलबच्यांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी कारखान्याचे लाखो रुपये या प्रकरणात खर्च केले. यापेक्षा गेल्या वर्षी २६५० रुपये जाहीर केलेला दर जरी दिला असता, तर खासदार राजू शेट्टी यांना आनंद झाला असता.
कारखाना खासगी असताना हजारो शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने भागभांडवल दिले. शेअर्स रकमेबाबत सोनिया गांधी, तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम, आॅस्कर फर्नांडिस यांच्याकडे तक्रारी केल्या. आता कारखाना पूर्ण उभा राहिला, ऊस तोडणी-वाहतूक तयार झाली, बॉयलर पेटविला आणि कारखाना बंद करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायदेवतेने माझ्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे महिनाभर कारखाना बंद ठेवून मंडलिक यांनी काय साधले ? याचे उत्तर कागलच्या जनतेला द्यावे लागेल. यावेळी घोरपडे कारखान्याचे संचालक भैया माने, अनिल साळोखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रत्यक्ष भेटून विनंती तरीही...
सदाशिवराव मंडलिक आजारी असताना त्यांना भेटलो. त्यावेळी कारखान्याबाबत राजकारण आणू नका, अशी विनंती केली होती. तरीही त्यांनी करायचे तेच केले. उभारलेला कारखाना मोडण्याचे पाप त्यांनी केल्याची टीका आमदार मुश्रीफ यांनी केली.