Kolhapur: आजरा कारखाना निवडणुकीत हसन मुश्रीफांचे वर्चस्व, सतेज पाटील-विनय कोरे आघाडीला धोबीपछाड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 04:42 PM2023-12-19T16:42:02+5:302023-12-19T16:43:23+5:30

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीप्रणीत रवळनाथ विकास आघाडीने २१ पैकी १९ जागा ...

Hasan Mushrif dominates Ajara factory elections, Satej Patil group is defeated | Kolhapur: आजरा कारखाना निवडणुकीत हसन मुश्रीफांचे वर्चस्व, सतेज पाटील-विनय कोरे आघाडीला धोबीपछाड

Kolhapur: आजरा कारखाना निवडणुकीत हसन मुश्रीफांचे वर्चस्व, सतेज पाटील-विनय कोरे आघाडीला धोबीपछाड

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादीप्रणीत रवळनाथ विकास आघाडीने २१ पैकी १९ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. विरोधी आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे गटाला केवळ १ जागा मिळाली, तर १ जागा बिनविरोध निवडून आली. कारखाना निवडणूक निकालाने आजरा तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले.

सभासदांनी विद्यमान सहा, माजी दोन संचालकांसह १३ नवीन चेहऱ्यांना संधी दिली. विद्यमान अध्यक्ष सुनील शिंत्रेंसह नऊ संचालकांना पराभवास सामोरे जावे लागले. कारखाना निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष पराभूत होण्याची ही तिसरी वेळ आहे. ‘ब’ वर्गातील फेरमतमोजणीत अशोक तरडेकर विजयी, तर नामदेव नार्वेकर यांचा १४ मतांनी पराभव झाला.

निवडणूक निकाल जाहीर होताच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. आजरा, उत्तूर, मडिलगे, भादवण, सरोळी, किणे, कानोली यासह उमेदवारांच्या गावांत रात्री उशिरापर्यंत विजयी मिरवणुका सुरू होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोपाळ मावळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमित गराडे, सुजय येजरे यांनी काम पाहिले.

सकाळी ८ वाजल्यापासून पंचायत समितीच्या सभागृहात मतमोजणीस प्रारंभ झाला. केंद्रनिहाय मतमोजणी सुरू झाल्यामुळे उत्तूर मडिलगे गटातून राष्ट्रवादीच्या रवळनाथ आघाडीला ६३० मतांची आघाडी मिळाली. हे मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत वाढतच गेले. रवळनाथ आघाडीचे सर्व उमेदवार ४०० ते १२०० च्या मताधिक्याने विजयी झाले.

‘ब’ वर्गातील निकालाचा कौल दुपारी १:३० च्या सुमारास लक्षात आला. त्यावेळी चाळोबादेव विकास आघाडीचे अशोक तरडेकर ४ मतांनी विजयी झाले. मात्र, सायंकाळी सर्व गटांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नामदेव नार्वेकर यांनी या गटातील फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र, फेरमतमोजणीत तरडेकर पुन्हा १४ मतांनी निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त होता.

सकाळपासूनच उमेदवारांच्या समर्थकांनी पंचायत समिती आवारात निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी निकालाचा कल लक्षात येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व रणहलगीच्या ठेक्यावर ताल धरला.

बिनविरोधऐवजी निवडणूक लागल्याने राष्ट्रवादीतील १३ कार्यकर्त्यांबरोबर पेरणोलीतील हरिबा कांबळे या सर्वसामान्य व्यक्तीला कारखान्याचे संचालकपद भूषविण्याची संधी मिळाली.

तिसऱ्यांदा गुलालाची हुलकावणी

जिल्हा बँक, तालुका संघ पाठोपाठ साखर कारखान्यात ही अशोक चराटी-जयवंत शिंपी गटाला कारखान्यात अंजना रेडेकर व सुनील शिंत्रे हे सोबत असूनही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे चराटी-शिंपी गटाची झालेली युती जनतेला मान्य नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. सलग तिसऱ्यांदा या गटाला गुलालाने हुलकावणी दिली.

नार्वेकर तिसऱ्यांदा पराभूत

२००६ व २०११ मध्ये नामदेव नार्वेकर यांचा ब वर्गातून पराभव झाला होता. यावेळी त्यांनी ‘ब’ वर्गातून आपले राजकीय भविष्य आजमाविण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा त्यांचा १४ मतांनी पराभव झाला.

अध्यक्षांचा पराभव होण्याची परंपरा कायम

२०११ च्या निवडणुकीत तत्कालीन विद्यमान अध्यक्ष जयवंत शिंपी तर २०१६ च्या निवडणुकीत तत्कालीन विद्यमान अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा पराभूत झाले होते. यावेळी सुनील शिंत्रे यांचाही पराभव झाला. त्यामुळे निवडणुकीत विद्यमान अध्यक्षांचा पराभव होण्याची परंपरा कायम राहिली.

उत्तूर भागाचे वर्चस्व

उत्तूर-मडिलगे गटाने राष्ट्रवादी आघाडीला किमान ६३० मतांची आघाडी दिली. ती शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहून ती अखेरपर्यंत १२०० मतापर्यंतची वाढली. त्यामुळे उत्तूर भाग एकसंघ असल्याचे निकालावरून लक्षात आले.

गाडीतून प्रचार तरीही सर्वाधिक मतदान

कारखान्याचे माजी अध्यक्ष विष्णू केसरकर यांना पायाला दुखापत झाल्याने त्यांनी गाडीत बसून गावोगावी प्रचार सभा केल्या. त्याचा फायदा त्यांना ८९२६ इतकी सर्वाधिक मते मिळाली.

अध्यक्ष-उपाध्यक्षाची संधी कोणाला ?

अध्यक्षपदासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक वसंत धुरे हे प्रमुख दावेदार आहेत. सर्वाधिक मते मिळवून व कारखान्याच्या स्थापनेपासून असलेले विष्णू केसरकर हेदेखील अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुश्रीफ हे धुरे यांना अध्यक्षपदाची तर उपाध्यक्षपदी एम. के. देसाई यांना संधी देण्याची शक्यता आहे.

‘राष्ट्रवादी’ला कारखान्याची लॉटरी

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जागांचा फॉर्म्युला ठरला. तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नसल्याने त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र कार्यकर्त्यांना ते मान्य नसल्याने व विरोधकांनी डिवचल्यामुळे राष्ट्रवादीने स्वतंत्र आघाडी करुन निवडणूक लढले व २१ पैकी १९ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले. कारखान्यातून बाहेर पडता-पडताच कारखान्याच्या सत्तेची लॉटरी लागल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साहात वातावरण आहे.

Web Title: Hasan Mushrif dominates Ajara factory elections, Satej Patil group is defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.