Hasan Mushrif ED Raid: ‘ईडी’चे २२ अधिकारी, तब्बल ३० तास चौकशी, जिल्हा बँकेचे पाच अधिकारी ताब्यात..जाणून घ्या घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 12:09 PM2023-02-03T12:09:49+5:302023-02-03T12:13:26+5:30

बँकेची ‘तरलता’ही तपासली

Hasan Mushrif ED Raid: 22 officers of ED, almost 30 hours of interrogation, five officers of District Bank detained | Hasan Mushrif ED Raid: ‘ईडी’चे २२ अधिकारी, तब्बल ३० तास चौकशी, जिल्हा बँकेचे पाच अधिकारी ताब्यात..जाणून घ्या घटनाक्रम

Hasan Mushrif ED Raid: ‘ईडी’चे २२ अधिकारी, तब्बल ३० तास चौकशी, जिल्हा बँकेचे पाच अधिकारी ताब्यात..जाणून घ्या घटनाक्रम

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना ईडीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांना पोलिस बंदोबस्तात मुंबईला नेण्यात आले. ईडीने तब्बल ३० तास ‘ब्रिक्स’ व ‘ संताजी घोरपडे’ साखर कारखान्याशी संबंधित सर्व व्यवहारांची कसून चौकशी करण्यात आली.

ईडी’च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह हरळी (ता. गडहिंग्लज) व सेनापती कापशी (ता. कागल) येथील शाखा व संताजी घोरपडे कारखान्यांवर छापे टाकले. बुधवारी दिवसभर व रात्रभर त्यांनी तपासणी केली. दोन साखर कारखान्यांशी संबंधित सर्व व्यवहारांची त्यांनी कसून चौकशी केली. स्थानिक राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांसह ‘ईडी’चे २२ अधिकारी दोन दिवस बँकेत ठाण मांडून बसले होते. 

दुपारी साडेचार वाजता चौकशी संपल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सायंकाळी पाच वाजता मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. माने, पत देखरेख विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहायक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर व राजू खाडे यांना समन्स बजावून ताब्यात घेतले. पावणेसहा वाजता पोलिस बंदोबस्तात ईडीच्या पथक अधिकाऱ्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले.

डॉ. मानेंसह अधिकाऱ्यांचे डोळे सुजले

सलग ३० तास चौकशी सुरू राहिल्याने अधिकाऱ्यांना झोप नसल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता. डॉ. ए. बी. मानेंसह सर्वच अधिकरी व कर्मचाऱ्यांचे डोळे सुजले होते.

अनुषंगिक कागदपत्रांच्या झेरॉक्स ताब्यात

‘ब्रिक्स’ व ‘संताजी घोरपडे’ साखर कारखाना व जिल्हा बँकेमध्ये झालेल्या व्यवहार व त्यासंबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.

खुर्चीवर रात्र जागून काढली

बँकेचे कर्मचारी बुधवारी सकाळी ११ वाजता आले होते. रात्र व गुरुवारचा दिवस ते बँकेतच थांबून होते. रात्री जेवण केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी खुर्चीवर बसूनच रात्र जागून काढली.

बँकेची ‘तरलता’ही तपासली

मिनी लॉन्ड्रिंगचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना असल्याने त्यासंबंधी ते सर्व मुद्द्यांच्या मुळापर्यंत पोहोचले होते. त्यातही जिल्हा बँकेची ‘तरलता’ही तपासल्याचे समजते.

पाऊण तासात मुंबईत हजर राहण्याचे आदेश

‘ईडी’चे अधिकारी रत्नेश कर्ण यांनी पाच वाजता बँकेच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. त्यामध्ये पावणेसहा वाजेपर्यंत ईडी मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले.

‘सीसीटीव्ही’ आणि रामराज्य....

बँकेत काेठे कोठे सीसीटीव्ही आहेत, अशी विचारणा त्यातील एका अधिकाऱ्याने केली. यावर पहिल्यासह तळमजल्यावर असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर येथे सगळे रामराज्यच दिसते, असे संबंधित अधिकाऱ्याने फटकारल्याचे समजते.

‘पी. ए.’, जनसंपर्क अधिकाऱ्यांकडेही चौकशी

बुधवारी रात्री बँकेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील व अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचे स्वीय सहायक सुभाष पाटील यांच्याकडेही ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

घोटाळा नसताना चौकशी, लढा देणार

बँकेत कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नसताना ‘ईडी’ची चौकशी होते कशी ? अधिकाऱ्यांची ३० तास चौकशी झाली असतानाही त्यांना पुन्हा चौकशीसाठी सोबत नेले जाते. यामागील हेतू काय आहे, हे लक्षात आले असेल. याविरोधात आम्ही लढा देऊ. - हसन मुश्रीफ, आमदार 

Web Title: Hasan Mushrif ED Raid: 22 officers of ED, almost 30 hours of interrogation, five officers of District Bank detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.