Hasan Mushrif ED Raid: जिल्हा बँक, ब्रिस्क, संताजी घोरपडे कारखान्याचे व्यवहार तपासले; छापेमारीदरम्यान भैय्या माने, पोलिस अधिकाऱ्यांत खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 02:03 PM2023-02-02T14:03:41+5:302023-02-02T14:04:49+5:30

अपेक्षित काहीच सापडेना..., राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक

Hasan Mushrif ED Raid: District Bank, Brisk, Santaji Ghorpade factory transactions checked; Clash between Bhaiyya Mane, police officers during the raid | Hasan Mushrif ED Raid: जिल्हा बँक, ब्रिस्क, संताजी घोरपडे कारखान्याचे व्यवहार तपासले; छापेमारीदरम्यान भैय्या माने, पोलिस अधिकाऱ्यांत खडाजंगी

Hasan Mushrif ED Raid: जिल्हा बँक, ब्रिस्क, संताजी घोरपडे कारखान्याचे व्यवहार तपासले; छापेमारीदरम्यान भैय्या माने, पोलिस अधिकाऱ्यांत खडाजंगी

googlenewsNext

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागचा ‘ईडी’चा ससेमिरा कायम असून, बुधवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयासह हरळी (ता. गडहिंग्लज) व सेनापती कापशी (ता. कागल) येथील शाखांवर ‘ईडी’चे छापे पडले. अठरा जणांच्या पथकाने तिन्ही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत कसून तपासणी केली. मुश्रीफ यांच्याशी संबंधित ‘ब्रिक्स’ व ‘संताजी घोरपडे’ साखर कारखान्यांसंबंधित व्यवहाराची तपासणी केलीच, त्याचबरोबर ‘भोगावती’ व ‘बिद्री’ कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्याचीही चौकशी केली.

आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ११ जानेवारी रोजी ‘ईडी’ने छापे टाकले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी अकरा वाजता ईडीचे अधिकारी जिल्हा बँकेच्या शाहूपुरी मुख्य कार्यालयासह ‘हरळी’ व सेनापती कापशी या शाखांत पोहोचले. मुख्य कार्यालयात आलेल्या पथकात सहा अधिकारी व दोन स्थानिक राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी असे आठजणांचा समावेश होता. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी तपासणी सुरू केली, तर इतर चार-चार जणांच्या पथकाने हरळी व सेनापती कापशी शाखांत तपासणी केली.

‘ब्रिक्स’, ‘घोरपडे’ कारखान्याशी जिल्हा बँकेने केलेल्या सर्व व्यवहारांची तपासणी केली. त्याचबरोबर संचालक मंडळातील इतरांना बँकेने केलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती घेतली. यामध्ये ‘भोगावती’ साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांना अधिकाऱ्यांनी बोलावून घेऊन चौकशी केली. त्याचबरोबर ‘बिद्री’ कारखान्याशी झालेल्या व्यवहाराचीही बँकेतील कागदपत्रांद्वारे चौकशी केली.

भैय्या माने, पोलिस अधिकाऱ्यांत खडाजंगी

ईडीचे पथक तपासणी करत असताना पाेलिसांनी मुख्य दरवाजा बंद केल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ लागली. दरवाजा खुला करून बँकेचा व्यवहार सुरळीत करा, तुमची तपासणी सुरूच राहू दे, असे भैय्या माने पाेलिसांना सांगत होते. मात्र, दरवाजा उघडणार नाही, यावर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी ठाम राहिल्याने माने व गवळी यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. त्यानंतर दरवाजा उघडण्यात आला आणि ग्राहक बँकेत गेले.

कर्मचारी तणावाखाली

ईडीचे अधिकारी बँकेत येताच, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. तपासणी पूर्ण होईपर्यंत कर्मचारी तणावाखाली दिसत होते.

कापशी शाखेतील ठेवींची केली तपासणी

सेनापती कापशी शाखेतील ठेवीदारांच्या याद्या घेऊनच अधिकारी चौकशीसाठी रवाना झाले होते. ठेवीच्या रक्कमांसह इतर व्यवहारांची चौकशी केल्याचे समजते.

पावणे नऊ वाजता अधिकारी परतले

हरळी व सेनापती कापशी शाखेत गेलेले अधिकारी रात्री पावणे नऊ वाजता मुख्य कार्यालयात पोेहोचले.

व्यवहार सुरळीत, चौकशीबाबत संताप

चौकशी सुरू असली तरी बँकेचा व्यवहार सुरळीत सुरू होता. मात्र, राज्यात पाचव्या क्रमांकावर व सर्वाधिक आयकर परतावा करणारी बँक म्हणून ‘कोल्हापूर’ बँकेचा नावलौकिक असताना, चौकशी सुरू असल्याचे समजताच, शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होता.

अपेक्षित काहीच सापडेना...

‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी दिवसभर अक्षरश: संबंधित संस्थांच्या कर्जप्रकरणांसह इतर कागदपत्रांची अक्षरश: झाडाझडती घेतली. रात्री पावणे आठच्या सुमारास प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अधिकाऱ्यांना भेटून त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांनी उत्तर देणे टाळले, किती तास चौकशी सुरू राहील? यावर, आम्हाला अपेक्षित आहे, ते अद्यापतरी सापडलेले नाही. ते सापडल्यानंतर आम्ही जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक

जिल्हा बँकेत ईडीचे अधिकारी आल्याचे समजताच, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात जमा झाले. यामध्ये शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, युवराज गवळी, आसिफ फरास, राजेश लाटकर, तौफिक मुल्लाणी, बँकेचे माजी संचालक विलास गाताडे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, उपाध्यक्ष मधुकर जांभळे, प्रकाश गवंडी, सुहास साळोखे, शिवाजी देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Hasan Mushrif ED Raid: District Bank, Brisk, Santaji Ghorpade factory transactions checked; Clash between Bhaiyya Mane, police officers during the raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.