Hasan Mushrif ED Raid: ईडीच्या छापेमारीविरोधात मुश्रीफ समर्थक संतप्त, जमिनीवर डोके आपटून घेतल्याने एक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 11:56 AM2023-03-11T11:56:09+5:302023-03-11T11:56:38+5:30
मुश्रीफांच्या निवासस्थानासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला
जहांगीर शेख
कागल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईने संतप्त झालेल्या एका मुश्रीफ समर्थकाने सीआरपीएफ जवानांच्या समोर जमिनीवर डोके आपटून घेतल्याने तो जखमी झाला. सागर दावणे (वय 33 रा. दावणे वसाहत कागल) असे त्याचे नाव आहे. जखमीस उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मुश्रीफांच्या निवासस्थानासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे.
सागर देवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचा पदाधिकारी असुन त्यांने छातीवर मुश्रीफ यांचे छायाचित्र गोंदुन घेतले आहे. कोल्हापूरचे माजी नगरसेवक राजू लाटकर, भय्या माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शितल फराकटे आदी कार्यकर्त्यांना शांत करीत आहेत. बंदोबस्तास आलेल्या पोलिसांशी समर्थकांची बाचाबाची होत आहे.
'सारखं येऊन त्रास देण्यापेक्षा आम्हाला गोळ्या झाडा'
दरम्यान, ईडीला सांगा सारख येऊन आम्हाला त्रास देण्यापेक्षा आम्हाला गोळ्या झाडा अशी संतप्त भावना आमदार हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांना अश्रुही अनावर झाले. निवासस्थाना समोर गेट जवळ येऊन त्यानी माध्यमासमोर भावना व्यक्त केल्या.
कागलमध्ये तणावाची परिस्थिती
दीड महिन्यांत तिसऱ्यांदा ईडीने मुश्रीफांच्या निवासस्थानी छापेमारी केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून कागलमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारीच उच्च न्यायालयाकडून हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळाला होता. मुश्रीफांवर २४ एप्रिलपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. यातच आज, शनिवारी सकाळी ईडीचे पथक मुश्रीफांच्या निवासस्थानी धडकले.