Hasan Mushrif: 'ईडी'च्या पथकाचा कोल्हापूर जिल्हा बँकेच्या हरळी शाखेवरही छापा, गडहिंग्लजमध्ये खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 06:54 PM2023-02-01T18:54:18+5:302023-02-01T18:58:35+5:30

गेल्या महिन्यात 'ब्रिस्क कंपनी'च्या पुणे येथील कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता

Hasan Mushrif: ED team also raided Harli branch of Kolhapur District Bank | Hasan Mushrif: 'ईडी'च्या पथकाचा कोल्हापूर जिल्हा बँकेच्या हरळी शाखेवरही छापा, गडहिंग्लजमध्ये खळबळ 

Hasan Mushrif: 'ईडी'च्या पथकाचा कोल्हापूर जिल्हा बँकेच्या हरळी शाखेवरही छापा, गडहिंग्लजमध्ये खळबळ 

Next

राम मगदूम

गडहिंग्लज ( जि.कोल्हापूर): हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवरदेखील सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने (ईडी) आज, बुधवारी(१) दुपारी छापा टाकला.सायंकाळी उशीरापर्यंत बंदोबस्तात शाखेतील व्यवहार आणि कागदपत्रांची तपासणी सुरू होती. त्यामुळे गडहिंग्लज विभागातही खळबळ उडाली.

२०१३-१४ मध्ये तत्कालीन मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारानेच येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना सहयोग तत्त्वावर 'ब्रिस्क फॅसिलिटीज प्रा.लि.कंपनी'ला १० वर्षांसाठी चालवायला देण्यात आला होता. दरम्यान, एप्रिल २०२१ मध्ये कराराची मुदत संपण्यापूर्वीच कंपनीने कारखाना सोडला आहे. परंतु, सुरुवातीला जिल्हा बँकेने कंपनीला अर्थसहाय्य केले होते. त्या पार्श्वभूमीवरच हा छापा टाकण्यात आल्याची चर्चा आहे.

मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेच्या मुख्यालयासह विविध शाखांवर आज 'ईडी'ने छापे टाकले. त्यापैकीच एका पथकाने हरळी येथील गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याच्या शेजारी असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेवरही छापा टाकला. 'ईडी'चे पथक दाखल होताच बाहेरच्या इतर कुणालाही बँकेत येण्या- जाण्यास मज्जाव करण्यात आला होता‌. शाखेबाहेर ‘सीआरपीएफ’चा बंदोबस्त होता.

दरम्यान, गडहिंग्लज कारखान्यात १०० कोटी रुपये बेनामी असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर केला होता. गेल्या महिन्यात 'ब्रिस्क कंपनी'च्या पुणे येथील कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. मात्र, त्यावेळी 'गडहिंग्लज'कडे ईडीचे अधिकारी फिरकले नव्हते.

Web Title: Hasan Mushrif: ED team also raided Harli branch of Kolhapur District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.