मुश्रीफांनी बहुजनांची घराणी संपवली, पदाधिकाऱ्यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:45 AM2024-09-05T11:45:39+5:302024-09-05T11:50:44+5:30

'विधानसभेची काळजी करू नका'

Hasan Mushrif ended the political dynasty of many Bahujans sensational allegations of office bearers in the presence of Sharad Pawar | मुश्रीफांनी बहुजनांची घराणी संपवली, पदाधिकाऱ्यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत खळबळजनक आरोप

मुश्रीफांनी बहुजनांची घराणी संपवली, पदाधिकाऱ्यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत खळबळजनक आरोप

कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सैतानी नेतृत्वाने जिल्ह्यातील उदयसिंगराव गायकवाड, दिग्विजय खानविलकर, निवेदिता माने, बाबासाहेब कुपेकर यांच्यासह अनेक बहुजनांची राजकीय घराणी संपवली, असा खळबळजनक आरोप बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला संपवल्यानेच पक्षाची वाताहात झाल्याचेही अनेकांनी भूमिका मांडली.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला, या वेळी कार्यकर्त्यांनी पोटतिडकीने भावना व्यक्त केल्या. अनिल घाटगे, मुकुंदराव देसाई, शिवानंद माळी, वैभव कांबळे, प्रकाश पाटील, शिवाजीराव सावंत, श्रीकांत पाटील, पद्मजा तिवले, नितीन पाटील, उदयसिंग पाटील, अश्विनी माने, शायली महाडिक, नागेश कोळी, शिवाजीराव खोत, अमर चव्हाण, आप्पासाहेब क्वाने, बी. के. डोंगळे, एकनाथ देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.

यावर, पक्षाध्यक्ष शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीची काळजी करू नका, महाराष्ट्रातील जनतेने भाजप व पळून गेेलेल्यांना घरी बसवण्याचे ठरवले आहे. ज्या जागा मिळतील त्यासह मित्रपक्षांसाठीही ताकदीने कामाला लागा. दरम्यान, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
बैठकीला जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, समरजीत घाटगे, राजीव आवळे, मदन कारंडे, नंदिनी बाभूळकर, रामराजे कुपेकर आदी उपस्थित होते.

‘राधानगरी’ची केस हाताबाहेरची

पक्ष फुटल्यानंतर राधानगरीत एकही बडा नेता आपल्यासोबत नव्हता, आता उमेदवारीसाठी येत आहेत. येथे धनशक्तीविरोधात जनशक्ती अशी लढाई व्हावी, अशी मागणी संतोष मेंगाणे यांनी केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुकुंदराव देसाई यांनी आजरा तालुक्यातील राजकारण सांगताना ‘राधानगरी’मधून के. पी. पाटील व ए. वाय. पाटील इच्छुक आहेत. आता मेरिटवर कोणाला उमेदवारी द्यायची हे तुम्हीच ठरवा, ही केस हाताबाहेरची असल्याचे सांगितले.

साटेलोट्याचे राजकारण घातक

शिवानंद माळी यांनी जिल्हा बँक व ‘गोकूळ’ दूध संघाचे राजकारण काही मंडळी एकत्र करत आहेत. यातून मी तुमच्या मतदारसंघात लक्ष देत नाही, तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका, असे साटेलोटे सुरू आहे. हे घातक असल्याचे सांगितले.

आवळेंची ‘मिरज’मधून तयारी

हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे यांना संधी देण्याची मागणी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केली. आघाडीत हातकणंगले काँग्रेसला जाणार असल्याने आवळे यांनी मिरजमधून तयारी केल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी उघड केले.

‘व्ही. बी., आर. के.’ ‘पद्माची नोंद घ्या

पंधरा वर्षे सत्तेचा लाभ घेतलेले लाभार्थी पळून गेले, पण आम्ही ठाम राहिलो. लोकसभेची आमची जागा काँग्रेसला दिली, त्यामुळे ‘कोल्हापूर उत्तर’ची जागा आम्हाला मिळाली पाहिजे. येथून व्ही. बी. पाटील व आर. के. पोवार यांच्यापैकी कोणालाही संधी द्या. ते दोघे नाही म्हटले तर मी लढायला तयार असल्याचे पद्मजा तिवले यांनी सांगितले. यावर, ‘व्ही. बी., आर. के.’ पद्माची नोंद घ्या आणि सावध राहा, असे शरद पवार यांनी सांगितले.

Web Title: Hasan Mushrif ended the political dynasty of many Bahujans sensational allegations of office bearers in the presence of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.