भाजपच्या मेहेरबानीमुळे मुश्रीफांना पालकमंत्रीपद, समरजित घाटगेंचा आक्रमक पवित्रा कायम
By समीर देशपांडे | Updated: October 5, 2023 13:18 IST2023-10-05T13:16:58+5:302023-10-05T13:18:24+5:30
‘जितना बडा संघर्ष होगा, उतनीही बडी जीत होगी’

भाजपच्या मेहेरबानीमुळे मुश्रीफांना पालकमंत्रीपद, समरजित घाटगेंचा आक्रमक पवित्रा कायम
कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्यातील संघर्ष कायमच राहणार असून हसन मुश्रीफ यांना भाजपच्या मेहेरबानीमुळे पालकमंत्रीपद मिळाले आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा घाटगे यांनी गुरूवारी मुश्रीफ यांना दिला आहे.
मुश्रीफ यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांनी घाटगे यांची भेट घेतली असता ते म्हणाले, मी त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो. याआधी ते नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपवर अतिशय कटू शब्दात टीका करत होते. आम्हांला जातीयवादी असल्याचे म्हणत होते. त्याच भाजपच्या मेहेरबानीमुळे, कृपेमुळे ते पालकमंत्री झाले आहेत.
त्यांची मनमान चालणार नाही. भाजपच्या चौकटीत राहून त्यांना काम करावे लागेल. जेव्हा ही चौकट मोडेल तेव्हा मी त्यांच्यासमोर उभा राहणार आहे. कागलमध्ये आमच्यात संघर्ष अटळ असून कागलमध्ये स्वराज्य येणं अटळ आहे. ‘जितना बडा संघर्ष होगा, उतनीही बडी जीत होगी’ अशा शब्दात घाटगे यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे.