साखरविक्रीतून पैसे हाणणाऱ्यांत हसन मुश्रीफही, राजू शेट्टींचा आरोप 

By राजाराम लोंढे | Published: November 8, 2023 01:02 PM2023-11-08T13:02:50+5:302023-11-08T13:07:19+5:30

कारखानदारांचा काटा काढायचा असेल तर ऊस कमी करा

Hasan Mushrif is among those who lost money from selling sugar. Raju Shetty allegation | साखरविक्रीतून पैसे हाणणाऱ्यांत हसन मुश्रीफही, राजू शेट्टींचा आरोप 

साखरविक्रीतून पैसे हाणणाऱ्यांत हसन मुश्रीफही, राजू शेट्टींचा आरोप 

राजाराम लोंढे/संदीप बावचे

कोल्हापूर : मागील हंगामातील चारशे रुपयांची शेट्टी यांची मागणी चुकीची असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणत आहेत. मागले मागू नका, पु्ढच्यात वाढवून देऊ, असे आमदार सतेज पाटील सांगत आहेत. कारखानदारांकडे पैसे असताना ते शेतकऱ्यांना देत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील हे एफआरपीपेक्षा जादा देऊ शकतात, ते साधुसंत नाहीत; मग त्यांच्याच पक्षाचे हसन मुश्रीफ यांना का परवडत नाही? एकदम ओके असे मी काही म्हणणार नाही; पण साखरविक्रीतून पैसे हाणणाऱ्यांमध्ये मुश्रीफसाहेब तुम्ही असाल असे वाटत नव्हते; पण तुम्हीही त्यातच अडकल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

ऊस परिषदेत शेट्टी यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर आसूड ओढले. शेट्टी म्हणाले, एप्रिल ते ऑक्टोबर या काळात जादा दराने साखर विक्री करून बिले मात्र कमी दराने करण्याचे पाप कारखानदारांनी केले आहे. प्रतिक्विंटल ८० ते ३६० रुपयांनी दर कमी दाखवले आहेत. कोल्हापूर व सांगलीतील ३७ कारखान्यांनी दर जाहीर करावेत, म्हणजे ‘दूध का दूध और पानी का पानी’ होईल. कमी दराने विक्री करून व्यापाऱ्यांचा फायदा केलेला नाही, तर फरकाची रक्कम रोखीने घेऊन कारखान्याच्या अध्यक्षांनी स्वत:चे खिसे भरले आहेत. बहुतांशी कारखान्याच्या अध्यक्षांच्या जवळच्या नातेवाइकांच्या साखर ट्रेडिंग कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचा फंडा कारखानदारांनी सुरू केला आहे.

पाऊस कमी झाल्याने ऊस वाळत असल्याचे कारखानदार सांगत आहेत, किती वाळायचा तो वाळू दे; पण या चोरांना ऊस देऊ नका. यंदा ज्वारी, हरभरा, गव्हाचे दर चांगले आहेत, शेतकऱ्यांनी उसाची लागण कमी करून या पिकाकडे वळावे. कारखानदारांचा काटा काढायचा असेल तर ऊस कमी करा, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

ऊस उत्पादनाच्या खर्चाचे गणित मांडत ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, मागील वर्षीचे चारशे रुपये मागतोय तो काही रतन खत्रीचा आकडा नाही, आमचा हिशेब आहे. तो आम्ही घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. यंदा उसाचे उत्पादन कमी असल्याने साखरेला सोन्याचा भाव मिळणार आहे. यासाठी एकरकमी ३५०० रुपये उचल घेतल्याशिवाय उसाला कोयता लावू देऊ नका.

अण्णा को गुस्सा क्यों आता है..

प्रकाश आवाडे (आण्णा) यांना अलीकडे आमचा राग येऊ लागला आहे. ‘अण्णा को गुस्सा क्यों आता है’, त्यांचा विषय न्यारा असल्याची टीका करत त्यांच्यासह गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सगळेच एकाच माळेचे मणी असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

पैसे देऊन पदे घेतली नाहीत..

सावकर मादनाईक यांनी तडाखेबंद भाषणात कारखानदारांवर हल्लाबोल केला. राजकारणासाठी आम्ही हा धंदा करत नाही, पैसे देऊन पदे घेतलेली नाहीत, असा टोला त्यांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे नाव न घेता लगावला.

‘प्रोत्साहन’चे पैसे दिले नाही तर मंत्र्यांना फिरू देणार नाही

प्रोत्साहन अनुदानाचे पैसे देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत असून तातडीने दिले नाहीत तर मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

वाट पाहू नका रुमण्याचं..

चालू हंगामातील उचलीपेक्षा मागील हंगामातील ४०० रुपये मिळालेच पाहिजेत, यासाठी संघटनेचा आग्रह राहिला. परिषदेत स्थळी फलकातून कारखानदारांना इशारा देण्यात आला होता. यामध्ये ‘वाट पाहू नका रुमण्याचं, जाहीर करा मागल्या वर्षांचं’ हा फलक लक्षवेधी होता.

शेट्टींबरोबरच मादनाईकांचे पोस्टर

विक्रमसिंह मैदानावर नेहमी राजू शेट्टी यांचेच मोठे कटआऊट लावले जात होते. यंदा त्यांच्यासोबतच तेवढ्याच उंचीचे सावकर मादनाईक यांचे लावले होते. त्यावर, ‘चळवळीचा निष्ठावंत शिलेदार’ असे लिहिले होते.

हवा सर्वसामान्यांसाठी लढणारा खासदार

‘हवा सर्वसामान्यांसाठी लढणारा खासदार’, ‘ना कुठली पेन्शन, ना कुठला पगार - राजू शेट्टींची चळवळ हाच आमचा आधार’ असे लिहिलेले टी शर्ट प्रत्येक कार्यकर्त्यांच्या अंगात होते.

Web Title: Hasan Mushrif is among those who lost money from selling sugar. Raju Shetty allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.