जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ निश्चित, मुश्रीफ-कोरे यांच्यात तासभर खलबते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 11:16 AM2022-01-20T11:16:47+5:302022-01-20T11:17:14+5:30
उपाध्यक्ष पदावर कॉंग्रेसचे आमदार राजू आवळे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज, गुरुवारी दुपारी तीन वाजता नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा होत आहे. अध्यक्ष पदासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेच नाव निश्चित झाले आहे. उपाध्यक्ष पदावर कॉंग्रेसचे आमदार राजू आवळे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता बँकेच्या सभागृहात सभा होत आहे. मंत्रीपदाच्या कामाचा व्याप असल्याने अध्यक्ष पद नको अशी भूमिका मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वी घेतली होती. त्यातच कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनीही अध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र मंत्री मुश्रीफ यांनीच अध्यक्षपद घ्यावे, असा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून दबाव आहे, त्यामुळे अध्यक्षपदाबाबत कमालीची उत्सुकता आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांतील हालचाली पाहता अध्यक्षपदी हसन मुश्रीफ यांची निवड निश्चित मानली जात आहे. उपाध्यक्ष पद कॉंग्रेसकडे राहणार असून आमदार राजू आवळे, श्रृतिका काटकर, स्मिता गवळी यांच्या नावाची चर्चा असली तरी आवळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आज, सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची बैठक शासकीय विश्रामगृहात होणार आहे. तिथे अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची नावे निश्चित होऊन दुपारी सर्वजण बँकेत निवडीसाठी जाणार आहेत.
विरोधी संचालकांचीही होणार बैठक
विरोधी परिवर्तन आघाडीच्या संचालकांची बैठक आज सकाळी साडेदहा वाजता शासकीय विश्रामगृहातच होणार आहे. येथे अध्यक्षपदाबाबतची चर्चा होणार आहे.
मुश्रीफ, कोरे यांच्यात तासभर खलबते
मंत्री हसन मुश्रीफ हे बुधवारी सांयकाळी कोल्हापुरात आले, त्यानंतर अध्यक्षपदाच्या हालचाली गतिमान झाल्या. ते सायंकाळी कागल येथून शासकीय विश्रामगृहात आले. येथे मुश्रीफ व आमदार विनय काेरे यांच्यात अध्यक्षपदाबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यातही चर्चा झाली.
शिवसेना एकत्र राहण्यासाठी प्रयत्न
शिवसेनेचे सत्तारूढ आघाडीत दोन व विरोधी आघाडीत तीन असे पाच संचालक आहेत. आपण सर्वजण एकत्र राहूया, असा प्रयत्न शिवसेना नेत्यांचा आहे.