Hasan Mushrif ED Raid: '..तर मुश्रीफ ईडी कार्यालयात का गेले नाहीत, ५२ तास अज्ञातवासात का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:06 PM2023-03-15T12:06:11+5:302023-03-15T12:07:00+5:30
ईडीचे अधिकारी चौकशीला आल्यानंतर सामोरे न जाता कुटुंबास वाऱ्यावर सोडून मागच्या दारातून मुश्रीफ आणि त्यांची मुले का पळून गेली?
कोल्हापूर : ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासंंबंधी समन्स बजावल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी सोमवारीच कार्यालयात जाणे अपेक्षित होते. पण ते स्वत: न जाता आपल्या वकिलास पाठवले. मंगळवारी न्यायालयाने दणके दिल्यानेच ते ईडी कार्यालयात गेल्याचा आरोप भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
ईडीचे अधिकारी चौकशीला आल्यानंतर सामोरे न जाता कुटुंबास वाऱ्यावर सोडून मागच्या दारातून मुश्रीफ आणि त्यांची मुले का पळून गेली? मुश्रीफ ५२ तास फरार आणि अज्ञातवासात का होते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
घाटगे म्हणाले, तुमच्यात वाघाचे काळीज होते तर भाभी म्हणजे तुमच्या पत्नीस व घरातील सुना, मुलांना घरी एकटे सोडून कसे काय पळून जाऊ शकता? कुटुंबाला वाऱ्यावर सोडला तसे मतदारसंघ, शेतकरी, बँकेला वाऱ्यावर तुम्ही सोडणार नाही का? ईडीच्या समन्सविरोधात मुश्रीफ उच्च न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयाने त्यांना समन्सनुसार ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.
ते दोषी नाहीत तर संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्याप्रमाणे ईडी कार्यालयात जाऊन चौकशीला सामाेरे का गेले नाहीत. जिल्हा बँकेचे मुश्रीफ अध्यक्ष आहेत. तुमच्याबाबत ईडीच्या कारवाईचा ससेमिरा सुरू असल्याने बँकेची बदनामी होत नाही का, अशी विचारणा घाटगे यांनी केली.
दिलासा नाही
घाटगे म्हणाले, संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासद फसवणुकीचा गुन्हा शेतकऱ्याने मुरगूडमध्ये दाखल केला आहे. त्याविरोधात ते न्यायालयात गेले. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना एक महिन्यात म्हणणे मांडण्याची मुदत दिली. हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्याचा सोयीनुसार अर्थ लावून कोर्टाने दिलासा दिल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरविल्या.
सीए गायब
सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यांचे ताळेबंद तयार करणारे सीए महेश गुरव गायब आहेत. त्याचे गौडबंगाल काय, असाही प्रश्नही घाटगे यांनी उपस्थित केला.