हसन मुश्रीफ हे महाराष्ट्राचे विद्वान मंत्री; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण याचे प्रत्युत्तर

By विश्वास पाटील | Published: October 6, 2023 10:13 PM2023-10-06T22:13:55+5:302023-10-06T22:15:44+5:30

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष दिले असते तर नांदेडमध्ये ही परिस्थिती ओढवली नसती अशी टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली होती.

hasan mushrif learned minister of maharashtra former chief minister ashok chavan reply | हसन मुश्रीफ हे महाराष्ट्राचे विद्वान मंत्री; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण याचे प्रत्युत्तर

हसन मुश्रीफ हे महाराष्ट्राचे विद्वान मंत्री; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण याचे प्रत्युत्तर

googlenewsNext

विश्वास पाटील, कोल्हापूर :हसन मुश्रीफ हे महाराष्ट्राचे विद्वान वैद्यकीय शिक्षण मंत्री असल्याचे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री लगेचच दिले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष दिले असते तर नांदेडमध्ये ही परिस्थिती ओढवली नसती अशी टीका मंत्री मुश्रीफ यांनी शुक्रवारी केली होती. त्याला माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी फेसबूक पोस्ट करून लगेच उत्तर दिले. त्यांनी पुरावा म्हणून डिसेंबर २०२२ च्या नागपूर अधिवेशनात काँग्रेसचे स्थानिक आमदार मोहन हंबर्डे यांनी उपस्थित केलेल्या रुग्णालयातील असुविधेबद्दल विचारलेल्या प्रश्र्नाचा सभागृहातील कामकाजाचा व्हिडीओही शेअर केला आहे.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणतात, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघात आहे. येथील काँग्रेस पक्षाचे स्थानिक आमदार मोहन हंबर्डे यांनी दि. २८ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात या रुग्णालयाच्या असुविधांबाबत सभागृहामध्ये सविस्तर माहिती दिली होती. मात्र, राज्य सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले. त्याचवेळी दखल घेऊन योग्य पावले उचलली असती तर कदाचित नांदेडची दुर्दैवी घटना टळू शकली असती. यापश्चातही राज्याचे विद्वान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचा आमदार म्हणून या घटनेसाठी माझ्यावर दोषारोपण करणार असतील तर मग ठाण्यातील महापालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत झालेले १८ मृत्यू, नागपूरच्या शासकीय रुग्णालयात एकाच दिवशी झालेले २३ मृत्यू, तसेच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात २४ तासांत झालेल्या १४ मृत्युंसाठी कोण जबाबदार आहे, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट करावे.

निश्चितच नांदेड हा माझा जिल्हा आहे. केवळ नांदेडच नव्हे तर राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यात अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृती होऊ नये, यासाठी मी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून कोणतेही राजकारण न करता समन्वयाची भूमिका घेतली. आरोग्य सेवेतील उणिवा दूर करण्यासाठी अनेक विधायक सूचना केल्या. केवळ नांदेडच नव्हे तर राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्यात अशा दुर्दैवी घटनेची पुनरावृती होऊ नये. मंत्री मुश्रीफ यांनी राजकीय टीकाटिप्पणीचा पोरखेळ न करता हा विषय गांभीर्याने घ्यावा, वस्तुस्थिती स्वीकारावी आणि आरोग्य सेवेत सुधारणा करून रुग्णांची गैरसोय कशी दूर करता येईल, याकडे लक्ष देणे राज्याच्या हिताचे आहे असेही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे.

Web Title: hasan mushrif learned minister of maharashtra former chief minister ashok chavan reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.