हसन मुश्रीफच माझे एक नंबरचे शत्रू
By admin | Published: January 29, 2017 12:36 AM2017-01-29T00:36:22+5:302017-01-29T00:36:22+5:30
संजय मंडलिक : संजय घाटगे आमदार आणि मी खासदार झाल्याशिवाय कागलचा विकास होणार नाही
म्हाकवे : माझा एक नंबरचा शत्रू आमदार हसन मुश्रीफ असून, शत्रूमध्ये त्यांना ‘ए प्लस’ दर्जा आहे. कोण, कुठे, कोणाला कार्यक्रमानिमित्त भेटले म्हणून युती होत नाही, असा टोला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी लगावला, तर शिवसेनेत मी अत्यंत सुखी व सुरक्षित आहे. माझे कार्यकर्तेही शिवसेनेशी एकरूप आहेत. पक्षश्रेष्ठींकडूनही माझा आदर होतो. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा माजी आमदार संजय घाटगे यांनी केला. प्रा. मंडलिक व संजय घाटगे यांनी आम्ही शिवसेना म्हणून एकत्र आणि एकसंध आहोत याचा पुनरुच्चार केला.
व्हन्नाळी (ता. कागल) येथे संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. प्रा. संजय मंडलिक यांचे आमदार हसन मुश्रीफांशी गुफ्तगू आणि संजय घाटगेंचा भाजप प्रवेशासंदर्भात उठलेल्या वावड्यांच्या पार्श्वभूमीवर ते दोघे बोलत होते.
मंडलिक, घाटगे म्हणाले, शिवसेनेच्या विरोधात जे कोणी उभे राहतील त्यांच्या विरोधात आम्ही दोघेही शिवसेना म्हणून एकदिलाने लढू. यासाठी आम्ही शिवसेनेतील मूळ संघटनेलाही बरोबर घेऊ. तसेच शेतकरी संघटनाही आमच्यासोबत येणार आहे. याचाच एक भाग म्हणून ५ फेब्रुवारीला आम्ही समृद्धी दूध संघाच्या कार्यस्थळावर भव्य मेळावाही घेणार आहोत. युती अथवा गटाचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय घेत नाही. ही आमची संस्कृती आहे. कार्यकर्तेच दैवत मानून आम्ही समाजकारण करतो.
प्रा. मंडलिक म्हणाले, ‘आता कुणाबरोबर युती करायची गरज नाही. संजय घाटगे आमदार आणि मी खासदार झाल्याशिवाय कागलचा विकास होणार नाही. त्यामुळे अशा अफवांना बळी पडून चर्चा करीत कार्यकर्त्यांनी बसू नये. गटातटाचे विसर्जन आम्ही गत लोकसभा निवडणुकीत केले आहे. नगरपालिका निवडणुकीत एक चंद्रकांत गवळी आणि दोन कर्मचारी तेवढेच मुश्रीफांसोबत गेले. उर्वरित कार्यकर्ते प्रामाणिकपणे समरजितसिंह घाटगे यांच्या सोबत राहिले. तरीही त्यांनी स्वतंत्रपणे मुरगूडमध्ये उमेदवार उभे केले. त्यांचे डिपॉझीट जप्त झाले.
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ‘दिवंगत खासदार मंडलिकांना दिलेल्या शब्दानुसार मी प्रा. मंडलिकांच्या सोबतच राहीन; परंतु मुलाला राजकारणात सुरक्षित करण्यासाठी मी राजकारण करीत नाही, तर आम्ही कार्यकर्त्यांसाठी आहोत. मुलाच्या हितासाठी कुणाच्या तुपातले उष्टे मी खाणार नाही. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून आमचे समाजकारण सुरू आहे. (वार्ताहर)
त्यांचे गुण बघूनच सोडले
प्रा. मंडलिक म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ सभा, बैठकांमधून आपल्याला एकटे पाडल्याचे सांगत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुश्रीफ यांच्यासोबत आतापर्यंत आम्ही आणि घाटगेंनी युती करून बरेच काही सोसले आहे. दिवंगत मंडलिक यांना मुश्रीफ यांनी दिलेला त्रास तर जगजाहीर आहे. म्हणून त्यांचे हे गुण पाहून त्यांची साथ सोडली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.’’
म्हणूनच जिल्हा बँकेत गेलो
जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी सर्वपक्षीय युतीतून मुश्रीफांच्या सोबत जाण्यासाठी मी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या गटाच्या बँकेतील नोकर, कार्यकर्त्यांना बदल्यांचा त्रास होतो. शिवाय सेवा संस्थाही अडचणीत येतात. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हितासाठी आणि इच्छेखातर निर्णय घेतला. या निवडणुकीत सुमारे ४०० मतांपैकी ३७५ मते मला पडली. ही सगळीच मते मुश्रीफ यांची नाहीत. आमचीही मते त्यांना मिळालीत, असा खुलासाही मंडलिकांनी केला.