कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ, क्षीरसागर, कोरे, अमल महाडिक मंत्रिपदाचे दावेदार
By समीर देशपांडे | Updated: November 24, 2024 14:05 IST2024-11-24T14:03:33+5:302024-11-24T14:05:11+5:30
पालकमंत्री पदासाठी क्षीरसागर, आबिटकरांमध्ये चुरस

कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ, क्षीरसागर, कोरे, अमल महाडिक मंत्रिपदाचे दावेदार
समीर देशपांडे
कोल्हापूर : राज्यात महायुतीचे भक्कम सरकार आणि त्यातही कोल्हापूर जिल्ह्यात अपक्षासह दहाही जागा निवडून आल्यानंतर आता जिल्ह्याला मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. बहुतांशी मान्यवर नेते निवडून आल्यामुळे जिल्ह्यात मंत्रिपदे देतानाही महायुतीच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.
शिंदेसेनेचे सर्वाधिक म्हणजे चार उमेदवार जिल्ह्यातून विजयी झाले. यातील राजेंद्र पाटील यड्रावकर हे तांत्रिकदृष्ट्या शाहू आघाडीचे असले, तरीही ते शिंदेसेनेचेच आहेत. गेल्या पाच वर्षांत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून राजेश क्षीरसागर यांनी प्रचंड निधी आणला, योजना राबविल्या. केवळ मतदारसंघापुरते क्षीरसागर यांनी काम न पाहता सातारा, सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातही आपले प्रभावक्षेत्र वाढवले. त्यामुळे क्षीरसागर हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत.
प्रकाश आबिटकर हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत तर चंद्रदीप नरके एकूण तीनवेळा निवडून आले. त्यामुळे या दोघांसह याआधी राज्यमंत्री राहिलेल्या यड्रावकरांचेही वजन वाढले आहे. म्हणूनच या चौघांनाही मंत्रिपदाची आशा आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस जिल्ह्यात दोन जागा लढवत होती. यात पालकमंत्री हसन मुश्रीफ विजयी झाले तर आमदार राजेश पाटील यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे जिल्ह्यातून हसन मुश्रीफ यांचे कॅबिनेट मंत्रिपद हे निश्चित मानले जाते. भाजपाने जिल्ह्यातून दोन जागा लढवल्या. कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत तर राहुल आवाडे यांची ही पहिलीच निवड आहे.
चंदगडमधून निवडून आलेले शिवाजीराव पाटील अपक्ष आहेत. त्यामुळे अमल हे भाजपाकडून मंत्रिपदाचे भक्कम दावेदार मानले जातात. सहकारातील मोठे प्रस्थ असलेल्या वारणा उद्योग समुहाचे विनय कोरे हे पाचव्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी याआधीही एकदा कॅबिनेट मंत्रिपद भूषविले होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असलेले कोरे हे नव्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असतील, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना जबर आशा आहे.
पालकमंत्री पदासाठी क्षीरसागर, आबिटकरांमध्ये चुरस
ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे जादा आमदार त्यांना पालकमंत्रिपद असे सूत्र गेली अनेकवर्षे ठरलेले आहे. राजेश क्षीरसागर आणि प्रकाश आबिटकर या दोघांनाही मंत्रिमंडळात संधी मिळाली तर पालकमंत्री पदासाठी या दोघांच्यात रस्सीखेच पाहायला मिळेल, असे दिसते. यातून एकनाथ शिंदे यांना एकाला निवडावे लागणार आहे.
सत्यजीत कदम यांचे पद निश्चित
ऐन विधानसभेच्या रणधुमाळीत भाजपाला सोडचिठ्ठी दिलेले सत्यजीत कदम यांचा भाव आता वधारला आहे. शिंदेसेनेत प्रवेश करतानाच्या चर्चेवेळी क्षीरसागर आमदार झाले तर राज्य नियाेजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद देण्याचा शब्द कदम यांना शिंदे यांनी दिला होता. शिंदे यांनी शब्द पाळला तर कदम यांचे पद निश्चित मानले जात आहे. कदम यांनी क्षीरसागर यांच्यासाठी मोठी राबणूक केली.