किरीट सोमय्यांची स्टंटबाजी कशासाठी, त्यांना अधिकार कोणी दिला?; हसन मुश्रीफ यांची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 01:38 PM2021-09-19T13:38:30+5:302021-09-19T13:39:26+5:30

कार्यकर्त्यांनी संयम बाळगण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

hasan mushrif replied kirit somaiya over his criticism | किरीट सोमय्यांची स्टंटबाजी कशासाठी, त्यांना अधिकार कोणी दिला?; हसन मुश्रीफ यांची विचारणा

किरीट सोमय्यांची स्टंटबाजी कशासाठी, त्यांना अधिकार कोणी दिला?; हसन मुश्रीफ यांची विचारणा

googlenewsNext

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांची कारखान्यावर जाण्याची स्टंटबाजी कशासाठी..? त्यांना हा अधिकार कोणी दिला अशी विचारणा रविवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा. माझी प्रकृती उत्तम आहे व काळजीचे काहीही कारण नाही, असे स्पष्टीकरण ही त्यांनी केले आहे.
          
मुंबईतून प्रसिद्धीला दिलेल्या  पत्रकात मंत्री मुश्रीफ म्हणतात, माजी खासदार सोमय्या यांनी वास्तविक माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर चुकीची खोटी तक्रार करून आरोप केलेले आहेत. तसेच त्यांनी आरओसीमधून (REGISTRAR OF COMPANIES) मिळवलेली कागदपत्रे केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिलेली आहेत. यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापा, चौकशी झाली आहे. तपास यंत्रणा ज्यावेळेस चौकशी करतील त्याचे योग्य उत्तर आम्ही देऊन त्यांना सहकार्य करूच. परंतु; किरीट सोमय्या यांची ही स्टंटबाजी कशासाठी..? त्यांना हा अधिकार कोणी दिला..? कारण त्याना एक सवयच लागली आहे की तक्रार करायची व तिथे जाऊन पर्यटन करून प्रसिद्धी मिळवायची. त्यातूनच विनाकारण बदनामी करण्याचा प्रकार करायचा. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्यावर प्रेम करणारे, माझी ३० -३५  वर्षाची सामाजिक व राजकीय कारकीर्द माहित आहेत, ते स्वस्त बसणार नाहीत याची मला खात्री आहे. परंतु; भाजपच्या अशा कटकारस्थानाना बळी पडू नका. संयम ठेवा, त्यांना अडवू नका. त्यांना माझा सल्ला आहे, मराठ्यांचा शूरवीर व बाणेदार सरसेनापती संताजी घोरपडे यांचे जिवंत स्मारक असलेला सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना त्यांनी बाहेरून नव्हे आत जाऊन पाहावा. आमचे मोजकेच लोक स्वागत करतील. जगातील हा एक अद्भुत साखर कारखाना असून खाली गाळप व उंचच-उंच डोंगरमाथ्यावर साखर तयार केली जाते. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात आलाच आहात तर माझ्या सर्व सामाजिक -राजकीय व ज्या- ज्या क्षेत्रामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली याबद्दल माहिती घ्यावी. हा कारखाना दहा वर्षापूर्वी उभारला आहे हजारो शेतकऱ्यांच्या भाव -भावनांचे प्रतीक म्हणून त्यांच्या कष्टाच्या, घामाच्या पैशातून हे श्रममंदिर उभारले आहे. नऊ गळीत हंगाम पूर्ण होत आहेत. शिळ्या कढीला ऊत आणला जात आहे. यामध्ये काळापैसा असल्याचे सिद्ध झाल्यास कोणतीही शिक्षा मी भोगीन. अन्यथा; किरीट सोमय्या यांना जन्माचीच अद्दल घडेल.  माझा पक्ष, माझा नेता शरद पवार व  केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर, परमवीरसिंग यांचेकडून भाजपने केलेली पक्षाची बदनामी याबद्दल मी सातत्याने भाजप पक्षावर आवाज उठवत आहे. त्यामुळे माझा आवाज दाबण्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रयत्न आहे. त्यांचा हा कुटील प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाही. 

चंद्रकांतदादांनी पुरुषार्थ दाखवावा

कोल्हापूर जिल्ह्यात आलेच आहेत तर जाता -जाता सोमय्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची झालेली वाताहात, भुईसपाट झालेला पक्ष याचीही माहिती आवर्जून घ्यावी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे वागावे आणि लढावे. हा कारखाना दहा वर्षांपूर्वी उभारला आहे आज याबाबत चर्चा का व्हावी..? शिळ्या कढीलाच हे नव्याने ऊत आणत आहेत .त्यांनी जरूर चौकशी करावी. परंतु; स्टंटबाजी करून बदनामी कशासाठी? म्हणून जनतेने संयम ठेवावा. कायदा व सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, याची काळजी घ्यावी.

मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी थंडी वाजून ताप आला होता. बैठक सुरू असताना ताप वाढतच असल्याचे माझ्या निदर्शनास आल्यामुळे मी तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन तब्येत दाखवली. बॉम्बे हॉस्पिटल हे माझे नियमित तपासणीचे हॉस्पिटल आहे. डॉक्टरांनी डेंगूसदृश्य ताप असल्याचे निदान केले व त्याची साथ असल्याचे सांगितले.  ताप उतरल्यानंतर प्लेटलेट्स कमी होतात, अशक्तपणा येतो. त्यामुळे तीन दिवस उपचारानंतर मला डिस्चार्ज देण्यात आला. परंतु; एक आठवडा विश्रांती घेण्याचा  डॉक्टरांचा सल्ला आहे. त्यामुळे मला पूर्वनियोजित अहमदनगरचा दौराही रद्द करावा लागला. त्यामुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्ते, चाहते व इतरांनीही काळजी करण्याचे काहीही कारण नाही असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
       
सर्वांचे पाठबळ मोलाचे

या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील -यड्रावकर, कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक, जनता दल अध्यक्ष श्रीपतराव शिंदे, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यासह विविध पक्षातील प्रमुख नेते, कार्यकर्ते व जनतेने मला मोठे पाठबळ दिले. ज्यांनी-ज्यांनी मला या लढाईत पाठबळ दिले, त्या सर्वांचा मी सदैव ऋणी आहे. बदनामी खटल्यासाठी ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य केले त्यांचेही मनःपूर्वक आभार.

दबक्या आवाजातसुद्धा चर्चा नाही

माझ्या २० वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. मी घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर जाहीर काय, साधी दबक्या आवाजातसुद्धा चर्चा झाली नाही. दरम्यान; पाठीमागील पाच वर्षात भाजपच्या काळात चिक्की घोटाळा, जमीन घोटाळा, गृहनिर्माण घोटाळा, चंद्रकांत पाटलांचा हायब्रीड ॲन्युटी घोटाळा या प्रकारची एकही चर्चा झालेली नाही.
 

Web Title: hasan mushrif replied kirit somaiya over his criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.