हसन मुश्रीफ महाराष्ट्र मंत्रीमंडळासाठी उपयुक्त - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 02:41 PM2019-01-13T14:41:25+5:302019-01-13T15:00:55+5:30
जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळासाठी मुश्रीफ उपयुक्त आहेत असे सांगत लोकसभेसाठी धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे संकेत शरद पवार यांनी रविवारी दिले.
कोल्हापूर - हसन मुश्रीफ हे उत्तम संघटक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करणारा आणि मोठी ताकद असलेला हा नेता आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळासाठी मुश्रीफ उपयुक्त आहेत असे सांगत लोकसभेसाठी धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे संकेत शरद पवार यांनी रविवारी दिले.
हसन मुश्रीफ यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कोल्हापूरच्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा जिल्ह्यात चर्चा सुरू झाली होती. परंतू शरद पवार यांनी स्पष्टपणे संकेत देत या विषयावर पडदा पाडला.
पवार म्हणाले, मुश्रीफ हे आमच्या पक्षाचे ‘मोस्ट सिनीअर’ नेते आहेत. त्यांच्या मताला पक्षामध्ये मोठे महत्व आहे. मात्र कुठल्या माणसाचा नेमका कुठं चांगला उपयोग होईल, संसदेत कोण अधिक योगदान देऊ शकेल याचाही विचार करावा लागतो. यासाठी त्यांनी कारखानीस आणि वसंतरावदादा पाटील यांची उदाहरणेही दिली. मुश्रीफ हे मास लीडर आहेत. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळासाठी अधिक फायदा होणार आहे.