Lok sabha 2024: 'त्या' व्हिडिओवरुन हसन मुश्रीफांचा महाविकास आघाडीच्या प्रचारकांना इशारा; म्हणाले, तर..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 04:12 PM2024-04-01T16:12:42+5:302024-04-01T16:14:35+5:30
'आम्हालाही इलाज राहणार नाही'
कागल : शाहू छत्रपती महाराज उमेदवार असले तरी त्यांच्या बद्दल सर्वांच्या मनात आदरभाव आहे. म्हणून आम्ही कोण त्यांच्यावर वैयक्तिक टिका करणार नाही. पण आज भय्या माने यांनी मला एक व्हिडिओ दाखविला. त्यामध्ये त्यांच्या प्रचार यंत्रणेकडुन आमचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर वैयक्तिक टिका केली आहे. अशी टीका त्यांच्या प्रचार यंत्रणेने करू नये. अशी माझी त्यांना विनंती आहे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जर प्रचाराची पातळी घसरली तर शाहू छत्रपती यांच्यावरही टिका होईल. आणि ते योग्य होणार नाही असेही मुश्रीफ म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी कागल-गडहिंग्लज विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येथील शाहु हॉलमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ही विनंती केली. जर व्यक्तीगत टीका होवून प्रचाराची पातळी घसरली तर शाहू छत्रपती यांच्यावरही अशी टिका होईल. आणि ते योग्य होणार नाही. त्यांच्या प्रति असणाऱ्या आदरस्थानास धक्का लागेल असे मुश्रीफ म्हणाले.
आम्हालाही इलाज राहणार नाही
उमेदवार संजय मंडलिक यांनी ही आपल्यावर जर व्यक्तीगत टीका होवू लागली तर आम्हालाही इलाज राहणार नाही. काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी शाहू छत्रपतींचा राजकीय बळी दिला आहे असे संजय मंडलिक म्हणाले. यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रविणसिह पाटील, गोकुळ दुध संघाचे संचालक युवराज पाटील, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ , जिल्हा बॅकेचे संचालक भय्या माने आदी मान्यवर उपस्थित होते.