हसन मुश्रीफ यांना मुद्दाम रावणाजवळ पाठविले : जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 12:50 PM2023-10-26T12:50:32+5:302023-10-26T12:51:11+5:30
आता सर्वांनी मिळून भाजपरुपी रावणाचे दहन करूया
इचलकरंजी : गॅस, पेट्रोल व वीजदरात वाढ झाल्यामुळे महागाईने मागील वर्षभरात परमोच्च बिंदू गाठला आहे. त्यामुळे जनता हैराण झाली आहे. या सर्व प्रश्नांचे प्रतीकात्मक दहन करून नवीन सुरुवात करूया. गतवर्षी रावणाचे दहन करण्यासाठी इचलकरंजीत आलेल्या हसन मुश्रीफ यांना भाजपरुपी रावणाचे दहन करण्यासाठी मुद्दाम रावणाच्या जवळ पाठविले आहे. आता सर्वांनी मिळून भाजपरुपी रावणाचे दहन करूया, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.
येथील श्रीराम सेवाभावी ट्रस्टच्यावतीने जवाहरनगर येथे आयोजित दसरा महोत्सवाच्या रावण दहन कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, शहरातील राष्ट्रवादीचे दोन्ही प्रमुख मदन कारंडे आणि नितीन जांभळे हे आता एकसंध झाले आहेत. ते चांगले काम करू शकतात. शहराचे वस्त्रोद्योगासह अनेक प्रश्न असून, ते सोडवायचे आहेत. त्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे रहावे.
यावेळी प्रांतिक सदस्य मदन कारंडे, शहर जिल्हाध्यक्ष नितीन जांभळे, शकुंतला मुळीक आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते रावण दहन करून सीमोल्लंघन करत सोने लुटण्याचा कार्यक्रम पार पडला.