हसन मुश्रीफांनी समरजित घाटगेंना दिल्या विधानसभेसाठी शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:43 IST2024-04-10T13:41:15+5:302024-04-10T13:43:07+5:30
..तर संजय मंडलिक आता कसे काय सांगू शकतील?

हसन मुश्रीफांनी समरजित घाटगेंना दिल्या विधानसभेसाठी शुभेच्छा
कागल : लोकसभा निवडणुकीसाठी कागल तालुक्यातील तिन्ही गटांचे वेगवेगळे मेळावे झाले आहेत. आता त्यांची इच्छा असेल तर एकत्रित मेळावाही घेऊया. विधानसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांची भूमिका काय हे या निवडणुकीत त्यांना विचारले तर ते कसे काय सांगू शकतील? म्हणून कोणीही हा विषय घेऊ नये. कागल विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर समरजित घाटगे हे विधानसभा लढवणार आहेत. त्यांनी तशी घोषणाही केली आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केले.
येथील शाहू हाॅलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. तेव्हा ते बोलत होते. कागलसारखी राजकीय परिस्थिती चंदगड, राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदारसंघातही आहे; पण शेवटी सटवीने ज्याच्या कपाळावर जे लिहिले आहे, ते मिळणारच आहे. परमेश्वराला जे मान्य आहे तेच होणार आहे. हा विचार करून सर्वांनी एकत्रित काम करूया. तिन्ही मतदारसंघातून मोठे मताधिक्य मंडलिक यांना मिळेल, असेही ते म्हणाले.
यावेळी शामराव पाटील, संजय चितारी, नितीन दिंडे, विजय काळे, शशिकांत नाईक, अजित कांबळे, प्रकाश गाडेकर, भय्या माने यांची भाषणे झाली.