‘गोकुळ’मध्ये हसन मुश्रीफ यांची भूमिका निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:24+5:302021-01-16T04:28:24+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ व जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा घुसळण सुरू ...

Hasan Mushrif's role in 'Gokul' is decisive | ‘गोकुळ’मध्ये हसन मुश्रीफ यांची भूमिका निर्णायक

‘गोकुळ’मध्ये हसन मुश्रीफ यांची भूमिका निर्णायक

googlenewsNext

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ व जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा घुसळण सुरू होणार आहे. जिल्हा बॅंकेपेक्षा ‘गोकुळ’ची निवडणूक अटीतटीची व प्रतिष्ठेची होणार आहे. सत्तारूढ व विरोधकांनी गेल्या वर्षभरापासून तयारी केली असली, तरी यामध्ये राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ते आपल्यासोबतच राहतील, असे दावे, प्रतिदावे सत्तारूढ व विरोधकांकडून केले जात असले, तरी त्यांनी पत्ते अद्याप खोललेले नाहीत.

जिल्हा बॅंक व ‘गोकुळ’ या दोन शिखर संस्थांवर ज्यांचे वर्चस्व, त्याचेच जिल्ह्याच्या राजकारणावर पकड राहते. त्यामुळे दोन्ही सत्तास्थाने हस्तगत करण्यासाठी चढाओढ पाहावयास मिळते. जिल्हा बॅंकेचे राजकारण हे तालुक्यातील विकास संस्थांवर अवलंबून असल्याने येथे प्रस्तापितांना सहसा धक्का लागत नाही. त्यामुळेच अपवाद वगळता २५-३० वर्षे संचालक म्हणून तीच तीच मंडळी दिसतात. ‘गोकुळ’मध्ये मात्र तशी परिस्थिती नाही. मागील निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे एकत्र आले होते. त्यांना पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी तगडे आव्हान दिले होते. सत्ता राखताना त्यांची दमछाक झाली होती. गेल्या पाच वर्षांत मल्टिस्टेट, नोकरभरतीसह ज्येष्ठ संचालकांचे बंड यामुळे ही निवडणूक सत्तारूढ गटाला तितकी सोपी नाही. त्यामुळेच मंत्री मुश्रीफ यांच्या रूपाने राष्ट्रवादी आपल्यासोबत रहावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत; तर जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ हे आपल्यासोबत असल्याने ‘गोकुळ’मध्येही ते राहतील, असा विरोधी गटाचा विश्वास आहे.

मंत्री मुश्रीफ यांच्यासह आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील यांच्याकडे ५०० ठराव आहेत. त्याशिवाय अरुण डोंगळे यांनीही ‘गोकुळ’च्या राजकारणात मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

असा राहू शकतो ‘केडीसीसी’चा फाॅर्म्युला

‘गोकुळ’च्या राजकारणाचे बॅंकेत पडसाद उमटणार असले, तरी येथे फारसा फरक पडणार नाही. विकास संस्था गटात बारा तालुक्यांतून प्रत्येकजण आपआपल्या ताकदीवर निवडून येतो. उर्वरित नऊ जागांसाठी दोन्ही काँग्रेस व शिवसेनेत समझोता होऊ शकतो.

-------------------------------------

‘महाविकास’ आघाडीला ‘गोकुळ’मध्ये ‘खो’

राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला राज्यातील स्थानिक स्वराज्य व सहकारी संस्थांत लागू करण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेतृत्वाचा असला, तरी कोल्हापुरात हा फाॅर्म्युला यशस्वी होणार नाही. महापालिकेपाठोपाठ ‘गोकुळ’मध्येही त्याला ‘खो’ बसणार, हे निश्चित आहे.

-------------------------------------

माजी अध्यक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न

‘गोकुळ’चे राजकारण हे विश्वास पाटील, अरुण डोंगळे, रवींद्र आपटे, रणजितसिंह पाटील व अरुण नरके यांच्याभोवतीच फिरते. ठराव दाखल करताना विश्वास पाटील, अरुण डोंगळे व शशिकांत पाटील-चुयेकर यांनी सवतासुभा केला होता. त्यानंतर डोंगळे यांनी सत्तारूढ गटाशी फारकत घेतली आहे. संभाव्य घडामोडी ओळखून सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी विश्वास पाटील यांच्याशी जुळवून घेतले आहे; मात्र शेवटच्या टप्प्यात अनपेक्षित घडामोडी नाकारता येत नाहीत.

----------------------------

चंद्रदीप नरके यांचे ‘वेट अन्ड वॉच’

गेल्या पाच वर्षांत ‘गोकुळ’च्या राजकारणात चंद्रदीप नरके हे सतेज पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून लढले. मात्र विधानसभा निवडणुकीपासून नरके यांनी सावध भूमिका घेतली असून, सध्या तरी त्यांची भूमिका ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ अशीच आहे.

संभाव्य कोण-कोणाबरोबर राहतील

सत्तारूढ गट : पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, सत्यजित पाटील, विनय कोरे, भरमूअण्णा पाटील, बजरंग देसाई, संजय घाटगे, अरुण नरके.

विरोधी : सतेज पाटील, हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, प्रकाश आबिटकर, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राजेश पाटील, राजू शेट्टी, संपतराव पवार.

Web Title: Hasan Mushrif's role in 'Gokul' is decisive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.