हसन मुश्रीफ माझ्या नादाला लागू नका, महागात पडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:28 AM2021-08-24T04:28:55+5:302021-08-24T04:28:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राजेंद्र पाटील-यड्रावकर मंत्री झाल्याने राजू शेट्टी अस्वस्थ असल्याचे हसन मुश्रीफ सांगत आहेत. मात्र, यड्रावकर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजेंद्र पाटील-यड्रावकर मंत्री झाल्याने राजू शेट्टी अस्वस्थ असल्याचे हसन मुश्रीफ सांगत आहेत. मात्र, यड्रावकर हे माझे पारंपरिक विरोधक आहेत आणि राहणारही, त्याची चिंता तुम्ही करू नका. अशाच घमेंडीत बोलणाऱ्या भाजपवाल्यांना पळवून लावले, माझ्या नादाला लागू नका, महागात पडेल, असा इशारा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. मोर्चा न काढण्याचा सल्ला देणारे पालकमंत्री सतेज पाटील हे गेले महिनाभर झोपले होते का, अशी टीकाही त्यांनी केली.
‘स्वाभिमानी’च्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात राजू शेट्टी बोलत होते. शेट्टी म्हणाले, भाजपला घालवून तुम्हाला सत्तेवर आणले आणि आता शहाणपणा शिकवीत आहात. पुन्हा दुसरा विचार करायला लावू नका, माझी दिशा बदललेली नाही, २०१९ ला विरोधात असताना येथेच येऊन केलेल्या मागण्या आठवा. हिंमत असेल तर हवा बदलल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची भेट घेणाऱ्या शरद पवार यांना विचारा.
दीड हजाराचा थर्मल स्कॅनिंग दहा हजार, शंभर रुपयाचे पीपीई किट १७५० रुपये, तर ११ रुपयांचा मास्क २०५ रुपयांना खरेदी केला. कोरोनाच्या आडून लूट केलेले पैसे कोणाच्या घशात गेले, असा सवाल करीत पूरग्रस्तांना १७ कोटी दिल्याचे पालकमंत्री सतेज पाटील खोटे सांगत आहेत. आम्हाला मोर्चा न काढण्याचा सल्ला देणारे महिनाभर झोपले होते का, अशी विचारणा शेट्टी यांनी केली.
तुमची शेपूट धरून यड्रावकरांना काय मिळाले
राजेंद्र पाटील-यड्रावकर हे राष्ट्रवादीत असताना, त्यांना काहीच मिळाले नाही. सत्तेचे लाभार्थी तुम्ही, इतरांनी सतरंजा उचलण्याचे काम केले, हे ए. वाय. पाटील, के. पी. पाटील यांना विचारा. तुमची शेपूट धरून यड्रावकरांना काहीच मिळाले नाही, म्हणून ते शिवसेनेत गेल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
दाव्यासाठी मुश्रीफांकडे पैसे आले कोठून
प्रत्येकावर अब्रुनुकसानीचे कोट्यवधींचे दावे दाखल करण्यासाठी हसन मुश्रीफ यांच्याकडे एवढे पैसे आले कोठून, स्कूटरवरून फिरणारे ४०० कोटींचा साखर कारखाना घेतात कसे, आम्ही नंगे फकीर आहोत, ‘स्वाभिमानी’च्या नादाला लागू नये, अन्यथा झोप उडविण्याची ताकद संघटनेच्या लाल बिल्ल्यात असल्याचा इशारा राजेंद्र गड्यान्नावर यांनी दिला.