राष्ट्रवादीच्या व्हर्च्युअल रॅलीत हसन मुश्रीफ भावनाविवश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:10+5:302020-12-13T04:37:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी कोल्हापुरातील व्हर्च्युअल रॅलीत संबोधित करताना राज्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी कोल्हापुरातील व्हर्च्युअल रॅलीत संबोधित करताना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे भावनाविवश झाले. विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीतील आपल्या विजयावर पवार यांना झालेल्या आनंदाची आठवण सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शाहू सांस्कृतिक मंदिर, शाहू मार्केट यार्ड येथे व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले होते. मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी शिरवळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, आदी उपस्थित होते. वेबसाईटचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर विभागनिहाय मंत्री व ज्येष्ठ नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. बीडहून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ठाण्यातून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नागपूरहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कोल्हापूरहून बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शरद पवार यांनी अठरापगड जातिधर्मांतील लोकांना सोबत घेऊन ५५ वर्षे समाजकारण केल्यानेच जिवाभावाची माणसे तयार झाली. कोल्हापूर हे पवारसाहेबांचे आजोळ आहे. आजोळच्या शुभेच्छा खूप महत्त्वाच्या असून त्यांची अपूर्ण इच्छा फलतृप्त होवो. त्यांनी नेहमी पुरोगामी विचारांनी राजकारण केल्यानेच माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला पाठबळ दिले. विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीच्या तोंडावर मिरज दंगल झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील दोन्ही कॉँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव झाला. मात्र या लाटेत आपण मोठ्या फरकाने विजयी झालो. त्यावेळी पवारसाहेबांनी, ‘राज्यात पुन्हा सत्ता आल्याचा आनंद आहेच; मात्र त्यापेक्षाही हसन मुश्रीफसारखा अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्ता विजयी झाल्याचा अधिक आनंद असल्या’ची भावना व्यक्त केल्याचे सांगताना मंत्री मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले.
यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, अशोकराव जांभळे, मानसिंगराव गायकवाड, व्ही. बी. पाटील, नविद मुश्रीफ, अनिल साळोखे, आर. के. पोवार, भैया माने, शीतल फराकटे, युवराज पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजेश लाटकर, आदिल फरास, आदी उपस्थित होते.
पवार यांचा जीवनपट उलगडला
शरद पवार यांच्या ५५ वर्षांतील राजकीय व सामाजिक जीवनातील सचित्र प्रवास दाखविण्यात आला. त्यामध्ये किल्लारीचा भूकंप, मुंबईतील दंगलीपासून अलीकडील चक्रीवादळ, महापूर आणि कोरोनाच्या काळात पवार यांनी केलेले काम पाहून कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले.
आनंद शिंदेच्या गाण्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष
मुंबईमध्ये कार्यक्रमाच्या अगोदर गायक आनंद शिंदे यांच्या गाण्याचे आयोजन केले होते. यामध्ये ‘खरा राजकारणी मनाचा सच्चा आहे... नादी लागले त्याचे बारा वाजले,’ या खड्या आवाजातील गाण्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
- राजाराम लोंढे