हसन मुश्रीफ गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटले-शिवलिंगेश्वर महास्वामीजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:30 PM2019-05-07T23:30:37+5:302019-05-07T23:32:27+5:30
गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांच्या सामाजिक जीवनात आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटले, असे प्रतिपादन निडसोशी मठाचे अधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. बेलेवाडी काळम्मा-धामणे ( ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे
सेनापती कापशी : गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांच्या सामाजिक जीवनात आमदार हसन मुश्रीफ हे गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटले, असे प्रतिपादन निडसोशी मठाचे अधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. बेलेवाडी काळम्मा-धामणे ( ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित विविध कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शिवलिंगेश्वर महास्वामीजींसह अलिबागचे राहुलजी पिंपळे महाराज यांच्या हस्ते कार्यस्थळावर बांधलेल्या श्री शिव दत्त मंदिराचा कलशारोहण सोहळा व मिल रोलर पूजन उत्साहात झाले. या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.
शिवलिंगेश्वर महास्वामी पुढे म्हणाले, आमदार मुश्रीफ यांचे राजकीय जीवन असो, सामाजिक कारकीर्द असो, कौटुंबिक जीवन असो, की या साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेले शेतकऱ्यांच्या कल्याणाचे कार्य असो, त्यांची उभी हयातच लोकसेवेने भरलेली आहे. या पुण्याईच्या जोरावर त्यांची विजयी घोडदौड सदैव राहील.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या पाच वर्षांत या कारखान्याने घेतलेली गरुडझेप महाराष्ट्रासह अखंड देशात कौतुकास्पद अशीच आहे.ते पुढे म्हणाले, वयाच्या २५व्या वर्षापासून समाजकारणात एक पणती बनून कार्यरत राहिलो. जनतेच्या पाठबळावर या पणतीची पुढे मशाल झाली. यापुढेही जनतेच्या आशीर्वादाने ही पणती लोककल्याणासाठी सदैव तेवत राहील.
अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी स्वागत केले. जनरल मॅनेजर महेश जोशी यांनी प्रास्ताविक केले. आभार लेबर आॅफिसर संतोष मस्ती यांनी मानले. विशाल बेलवळकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील,सतीश पाटील-गिजवणेकर, मनोज भाऊ फराकटे, सूर्याजी घोरपडे, शशिकांत खोत, आदी प्रमुख उपस्थित होते.
पवित्र योगायोग.....
भाषणात प्रताप ऊर्फ भैया माने म्हणाले, कालच शिवजयंतीचा दिवस होता. आज साडेतीन मुहूर्तांपैकी उत्कृष्ट मुहूर्त अक्षय तृतीया आहे. तसेच बसवेश्वर जयंती आणि मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिन्याची सुरुवातही आज होत आहे. कार्यस्थळावरील श्री शिव दत्त मंदिराचे कलशारोहण होत आहे, हा सुद्धा पवित्र योगायोगच आहे.