हसन मुश्रीफ यांच्या राजकीय मुत्सद्दीगिरीमुळे विजयाचा मार्ग सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:24 AM2021-05-06T04:24:38+5:302021-05-06T04:24:38+5:30
(हसन मुश्रीफ यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी आघाडीच्या घवघवीत यशामागे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ ...
(हसन मुश्रीफ यांचा फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी आघाडीच्या घवघवीत यशामागे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची राजकीय मुत्सद्दीगिरी आहे. मागील महिनाभर ते रोज शंभर ते दीडशे ठरावधारकांशी संपर्क साधत होते. आघाडीची ध्येयधोरणे सांगत असतानाच दूध उत्पादकांचा विश्वास जिंकण्यात ते यशस्वी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील सगळी ताकद आघाडीच्या मागे लावल्याने विजय सोपा होण्यात मदत झाली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील राम- लक्ष्मणाची जोडी म्हणून हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्याकडे पाहिले जाते. महापालिका, जिल्हा परिषद, विधान परिषदेसह विधानसभा निवडणुकीतही दोघांनी हातात हात घालून काम केल्याने जिल्ह्यातील सर्व सत्ताकेंद्रे त्यांच्या हातात आहेत. ‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत मंत्री मुश्रीफ हे सत्तारूढ गटासोबत गेल्याने मंत्री सतेज पाटील यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. या वेळेला मात्र काहीही झाले तरी दोघांनी मिळून सत्तांतर घडवायचे, हे मंत्री मुश्रीफ यांनी ठरवले होते. सत्तारूढ गटाकडून जागांची ऑफर आली, जिल्हा बँकेचे राजकारण सोपे करण्याची आश्वासने आली. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. दोघांनी मिळून निवडणुकीचा प्लॅन तयार केला आणि त्यानुसार जोडण्या लावल्या.
मंत्री मुश्रीफ यांच्या नियोजनाला राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची साथ मिळाली. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रवीणसिंह पाटील, युवराज पाटील, प्रकाश गाडेकर, सतीश पाटील आदींनी प्रचाराची धुरा सांभाळली. माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, मानसिंगराव गायकवाड, मधुकर जांभळे आदींची फौज होती. राष्ट्रवादीची जिल्ह्यातील सगळी ताकद आघाडीच्या मागे लावल्याने विजय सोपा झाला.