भाताच्या धूळवाफ पेरणीची धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:50+5:302021-06-02T04:19:50+5:30

चंदगड : तालुक्याच्या पूर्वेकडील किणी-कर्यात भागात धूळवाफ पेरण्या गतिमान झाल्या आहेत. कोरोनाचे भय दूर सारून परिसरातील बळीराजा पेरणीपूर्व ...

Haste of rice dust sowing | भाताच्या धूळवाफ पेरणीची धांदल

भाताच्या धूळवाफ पेरणीची धांदल

Next

चंदगड : तालुक्याच्या पूर्वेकडील किणी-कर्यात भागात धूळवाफ पेरण्या गतिमान झाल्या आहेत. कोरोनाचे भय दूर सारून परिसरातील बळीराजा पेरणीपूर्व अंतिम मशागती व धूळवाफ पेरण्यांत सहकुटुंब व्यस्त आहे.

जिल्ह्यातील भात पिकाचे कोठार समजल्या जाणा-या चंदगड तालक्यातील माणगाव ते राजगोळीपर्यंतच्या पट्ट्यात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अलिकडे ऊस पिकाखालील जमीन वाढली असली तरी येथील भाताचा बाज अद्याप टिकून आहे.

माॅन्सूनपूर्व रोहिणी नक्षत्रात धूळवाफ पेरणीसाठी इकडे ५ पात्यांच्या कुरीचा वापर सर्रास शेतकरी करतात. यामुळे कमी मनुष्यबळ व कमी श्रमात जास्त क्षेत्रावर पेरणी करता येते.

यंदा तोक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या पावसाने पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली होती. ती गतिमान होण्याबरोबरच गेल्या चार दिवसांत धूळपेरणीची धांदल उडाली आहे.

सध्या कृषी केंद्रावर सोनम, दप्तरी, इंद्रायणी, बासमती, आर वन, टायचुंग, वाय. एस. आर, श्रीराम, ३१२, अमन, रत्नागिरी आदी संकरित बियाणे उपलब्ध आहेत. यातील बहुतांशी जातींच्या भातावर वर्षभर साठवणुकीवेळी गुणगुणे, सुरूम, टोके, भोंगेसारखी कीड पडत असल्याने साठवणुकीसाठी अयोग्य असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा किडीला प्रतिकार करणा-या पारंपरिक वाणांच्या शोधात अनेक शेतकरी आहेत.

सध्या कालकुंद्री, कुदनूर, किणी, नागरदळे, कोवाड, निट्टूर, कागणी, म्हाळेवाडी आदी गावात पेरण्यांचा जोर आहे. दिवसागणिक गगनाला भिडणारे खतांचे, कीटकनाशके व बियाण्यांचे दर यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे.

-----------------------

फोटो ओळी : कालकुंद्री शिवारात कुरीच्या साहाय्याने धूळवाफ पेरणीत व्यस्त असलेले शेतकरी.

क्रमांक : ०१०६२०२१-गड-०९

Web Title: Haste of rice dust sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.