सोमय्या प्रकरणात जुने हिशोब चुकते करण्याची घाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:26 AM2021-09-21T04:26:14+5:302021-09-21T04:26:14+5:30
विश्वास पाटील- लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात गैरव्यवहाराचे ...
विश्वास पाटील- लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर शह-काटशहाच्या राजकारणाला उकळी फुटल्याचे चित्र जिल्ह्याच्या राजकारणात दिसत आहे. या घटनेची संधी साधून जुने हिशोब चुकते करण्याची घाई सुरू आहे.
मागच्या भाजप सरकारच्या काळात आणि त्यानंतर आता सव्वादोन वर्षांच्या महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात मंत्री मुश्रीफ यांनी भाजपला सातत्याने अंगावर घेतले आहे. देशात व राज्यात कुठेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य कोणत्याही नेत्याने टीका केली, तर त्याचे प्रत्युत्तर एकटे मुश्रीफ हेच देत आले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणातही ते पहिल्या दिवसापासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात बोलत आहेत. ते भाजपच्या हातातील बाहुले असल्याचा आरोप ते करीत आले आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचे असूनही त्यांच्यावरील आरोपांना अगदी शिवसेनेनेही उत्तर दिले नाही तेवढ्या वेळा मुश्रीफ यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांचे एकही विधान असे नाही की त्याला मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले नाही. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या राजकारणात मुश्रीफ यांची सत्ता काढून घेण्याचा प्रयत्न भाजपची सत्ता असताना चंद्रकांत पाटील यांनी केला होता; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. तेव्हापासून त्यांच्यातील वितुष्ट वाढत गेले. त्यामुळे मुश्रीफ भाजपच्या रडारवर होतेच, त्याचे प्रत्यंतर सोमय्या यांनी केलेल्या आरोपाने आले.
आताही जिल्हा बँकेत गेली पाच वर्षे मुश्रीफ हेच अध्यक्ष आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या त्यांच्या हालचाली आहेत; परंतु माजी आमदार महादेवराव महाडिक त्यांच्या विरोधात पॅनल करण्याच्या प्रयत्नात आहेत. गोकुळमध्ये मुश्रीफ यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना मदत केल्यामुळे महाडिक यांच्या हातातून तीस वर्षांची ही आर्थिक सत्ता त्यांनी काढून घेतली. त्यामुळे मुश्रीफ यांना जिल्हा बँक सहजासहजी मिळू द्यायची नाही अशा हालचाली भाजपच्या पातळीवर सुरू आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यास ८५ कोटींची थकहमी देण्याचा विषय राज्य शासनाकडे प्रलंबित आहे. ही थकहमी देऊ नये यासाठी मुश्रीफ व सतेज पाटील यांनी वजन वापरले आहे. त्यामागेही जिल्हा बँक, गोकुळचे राजकारण व महाडिक गटाकडून सतेज पाटील यांच्यावर करण्यात आलेले आरोप हेच मुख्य कारण आहे. त्यामुळे सोमय्या प्रकरणात महाडिक गट उघडपणे कुठेही चित्रात आला नाही; परंतु त्या गटाचे शिलेदार माजी महापौर सुनील कदम यांचा सोमय्या यांच्याबरोबरचा फोटो पाहून अनेकांना जरूर आश्चर्य वाटले; परंतु त्याच्या मागे हे राजकारण आहे. महापालिका निवडणुकीतील सदरबझार परिसरातील वादाचे दुखणेही आहेच. त्याचे पडसाद धनंजय महाडिक यांच्या लोकसभा निवडणुकीतही उमटले होते.
कागलमधील पडसाद..
कागलच्या राजकारणात मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा दोस्ताना वाढला आहे. त्यातून मंडलिक गट अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. गोकुळच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर वीरेंद्र मंडलिक यांनी केलेली फेसबुक पोस्ट बरीच चर्चेची ठरली होती. त्यामुळे तिथे वीरेंद्रला संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत ताकद वापरून मुरलीधर जाधव यांच्या नियुक्तीवरून झालेला वाद मिटविण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु आता मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी डीपीला नेते दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचा फोटो लावून पन्नास वर्षांत भ्रष्टाचार सोडाच, वाघाकडे देशात कुणी बोट दाखवायची हिंमत केली नाही अशी कमेंट केली आहे. ती नक्कीच मुश्रीफ यांना डिवचणारी आहे.