हासूर सासगिरी पहिले वीज थकबाकीमुक्त गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:42+5:302021-03-20T04:21:42+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हासूर सासगिरी (ता. गडहिंग्लज) हे पहिले वीजबिल थकबाकीमुक्त गाव ठरले. गावातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हासूर सासगिरी (ता. गडहिंग्लज) हे पहिले वीजबिल थकबाकीमुक्त गाव ठरले. गावातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीतील वीज ग्राहकांनी टाळेबंदी कालावधीतील थकीत वीजबिलासह चालू वीजबिलांचा भरणा केला आहे. महावितरणने येथील ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. जनमित्र यशवंत सावंत यांचा पाठपुरावा, ग्राहक सेवेमुळे हे शक्य झाले आहे.
सामानगड किल्ल्याच्या पायथ्याशी, डोंगरांच्या कुशीत हे गाव वसलेले आहे. गावची लोकसंख्या जवळपास १,१०० आहे. गावातील २४५ वीज ग्राहकांना सेवा पुरवली जाते. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा या वर्गवारीतील १५३ वीज ग्राहकांनी २ लाख ३ हजार ५४८ रुपये थकबाकीचा भरणा केला. सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्या सहकार्यातून गाव थकबाकीमुक्त झाले. येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ विष्णू कदम यांनी वायरमन सावंत यांनी चांगली सेवा दिल्यामुळेच थकबाकी शून्य झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी गावातील शेतीपंपाचीही थकबाकी शून्य करण्याचे आश्वासन दिले आहे. गावातील ९४ शेतीपंप ग्राहकांकडे वीजबिलाची १२ लाख ५५ हजारांची थकबाकी आहे.
कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या हस्ते जनमित्र सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय अभियंता संदीप दंडवते, शाखा अभियंता संजय पाटील यांच्यासह जनमित्र उपस्थित होते.