हातकणंगले, बुलडाणा ‘स्वाभिमानी’च्या वाट्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:32 AM2019-03-05T00:32:18+5:302019-03-05T00:32:23+5:30
विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेच्या हातकणंगले व बुलडाणा या जागा देण्याबाबत शिक्कामोर्तब ...
विश्वास पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेच्या हातकणंगले व बुलडाणा या जागा देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तशी घोषणा रविवारी नांदेड येथे केली; परंतु बुलडाण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने त्या पक्षाने संमती देण्याची गरज आहे. येत्या दोन-तीन दिवसांत दोन्ही काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकत्रित बैठक होत आहे. त्यामध्येच त्याचा अंतिम निर्णय होईल.
संघटनेने तीन जागा मागितल्या आहेत, त्यातील दोन मिळत असतील तर संघटनेलाही ते हवेच आहे. दुसऱ्या बाजूला खासदार राजू शेट्टी यांच्यासारखा मोदी सरकारविरोधात आक्रमक बोलणारा नेता आघाडीत हवा ही देखील दोन्ही काँग्रेसचीही अगतिकता आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी काही करून शेट्टी यांना आघाडीतून बाहेर जाऊ देणार नाही. बुलडाण्यातून संघटनेचे रविकांत तूपकर हे उमेदवार असतील. त्यांनी जिल्ह्यात चांगला जम बसविला आहे. संघटनेला लोकसभेच्या दोन जागांवर विजय व ६ टक्के मते मिळाल्यास प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळते. संघटनेतील दोन नंबरचे नेतृत्व म्हणून तूपकर यांना बळ देणे याचा शेट्टी यांच्यावरही दबाव आहे.
त्यामुळे बुलडाण्याची जागा मिळाल्यास संघटनेला आघाडीसोबत जाण्यात अडचण नाही. या मतदारसंघांतून राष्ट्रवादीकडून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव चर्चेत आहे.
त्यांच्यासाठी स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार हेच आग्रही आहेत; परंतु त्यांना जर स्वाभिमानी संघटना आघाडीत हवी असेल तर ही जागा सोडावीच लागेल, असे चित्र आहे. तो अंदाज घेऊनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी तशी घोषणा केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
इंद्रजित देशमुख अजून द्विधा मन:स्थितीत...
च्संघटनेने सांगली लोकसभेची जागा आपल्याला द्यावी व तेथून निवृत्त सरकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांना लढण्याची आॅफर दिली आहे; परंतु ते अजून द्विधा मनस्थितीत आहेत.
मी आयुष्यभर रचनात्मक काम करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे राजकारणात जाऊन मला एकमेकांची उणीदुणी काढणे जमणार नाही, असे त्यांना वाटते. तुमच्यासारखी चांगली माणसे राजकारणात यायला हवीत. उणीदुणी काढायचीच नाहीत.
आपण आपले चांगले काम घेऊन पुढे जायचे, असा आग्रह खासदार शेट्टी यांनी त्यांच्याकडे धरला आहे. ही जागा काँग्रेसकडूनही स्वाभिमानीला मिळणार का, याची अजून खात्री नसल्याने देशमुख यांना आग्रह करण्यातही अडचणी येत आहेत.