हातकणंगले नगरपंचायत, हुपरी नगरपरिषदेसाठी प्रतीक्षा
By admin | Published: June 24, 2016 12:17 AM2016-06-24T00:17:26+5:302016-06-24T00:45:41+5:30
ग्रामस्थांमध्ये निराशा : नगरविकास विभागाकडून अंमलबजावणीच नाही
दत्ता बिडकर --हातकणंगले --शासनाने नगरपालिका निवडणुकीची घोषणा केली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी, कबनूर, हातकणंगले नगरपंचायती -नगरपरिषदासाठी शासनस्तरावर कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू नसल्याने या गावामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वरील तीनही गावांचा समावेश नगरविकास विभागाकडे होणार असल्याचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी ठामपणे सांगत आहेत. मात्र, निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे या गावाच्या पदरी निराशाच आली आहे.
हातकणंगले तालुक्यातील हुपरी गावच्या लोकसंख्येचा विचार होऊन ग्रामस्थांना नागरी सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी मोर्चा, उपोषण यासारखी आंदोलने करून हुपरी नगरपंचायतीची अधिसूचना काढण्यास शासनाला भाग पाडले. अधिसूचना काढून आठ-दहा महिने संपूनही अद्याप याबाबत नगरविकास विभागाने अंमलबजावणी केली नाही.
आघाडी सरकारने राज्यातील तालुक्याची गावे नगरपंचायतींनी जोडण्याचा महत्त्वाकांशी निर्णय घेतला होता. सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची गावे चार महिन्यांपूर्वी शासनाने नगरपंचायतीमध्ये रूपांतर केली. या नगरपंचायतीच्या निवडणुका नोव्हेंबरअखेर होत आहेत. शासनाने सांगली जिल्ह्याला वेगळा न्याय आणि कोल्हापूरला वेगळा ही भूमिका ठेवली आहे. हातकणंगले हे तालुक्याचे गाव असून गेली दोन वर्षे नगरपंचायत होण्यासाठी प्रतीक्षेत आहे.
कबनूर ग्रामपंचायत इचलकरंजी शहराचा एक भाग बनून राहिली आहे. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या तालुक्यामध्ये सर्वाधिक आहे. इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी या ग्रामपंचायतीचे स्वतंत्र नगरपरिषदेमध्ये रूपांतर होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले आहेत. या ग्रामपंचायतीचा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची परवानगी घेऊन तो मंत्रालयामध्ये मंजुरीसाठी सादर केला आहे.
वरील तीन ग्रामपंचायतींचा समावेश नगरविकास विभागाकडे झाल्यास तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यसंख्या कमी होणार
आहे. यामुळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. याची धास्ती अनेक दिग्गज जिल्हा परिषद सदस्यांनी घेतली आहे.
प्रस्ताव शासन दरबारी
हुपरी आणि हातकणंगले ग्रामपंचायतीचे नगरपंचायती- नगरपरिषदासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजूर करून शासनाकडे पाठविले आहेत. शासनाच्या नगरविकास विभागाकडून याबाबत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायती-नगरपरिषदामध्ये होईल, असे मत
जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) एम. एस. घुले यांनी
व्यक्त केले.