हातकणंगले रेल्वे स्थानकाचा विकास व्हावा रेल्वेची वाट लोकांची ‘वाट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:23 AM2018-09-01T00:23:57+5:302018-09-01T00:24:31+5:30
स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून हातकणंगले रेल्वेस्थानक सुविधांपासून वंचित आहे. प्रवाशांना चहासुद्धा मिळत नाही अशी स्थिती आहे.
दत्ता बिडकर ।
हातकणंगले : स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून हातकणंगले रेल्वेस्थानक सुविधांपासून वंचित आहे. प्रवाशांना चहासुद्धा मिळत नाही अशी स्थिती आहे. मिरज-कोल्हापूररेल्वे टॅÑकचे अद्यापही दुहेरीकरण झालेले नाही. इचलकरंजी शहर देशाचे मँचेस्टर म्हणून रेल्वेमार्गाने जोडण्याचा आर्थिक खर्च रेल्वे मंत्रालयाला परवडणारा आहे का? इचलकरंजीस रेल्वे नेण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवाल शेतकरी करीत आहे. सरकारचे हेच बजेट हातकणंगले रेल्वे स्थानकाला सुविधा पुरविण्यावर खर्च झाले तर इचलकरंजी-हातकणंगले परिसराचा सर्वच बाजूने विकास होईल.
संस्थानकाळचे हातकणंगले रेल्वे स्थानक आजही त्याच सुविधांमध्ये आहे. स्थानकात कँटीन नाही, प्रवाशांसाठी स्वच्छतागृह नाही. कोणत्याही सोयी-सुविधा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नाहीत. हातकणंगले रेल्वे स्थानकाचा विकास करावा, अशी मागणी वारंवार करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते.
कोणत्याही शहराच्या विकासासाठी रेल्वेची गरज किती यावर विचार होण्याची गरज आहे. इचलकरंजी शहरापर्यंत रेल्वे पोहोचणे गरजेचे आहे का? हातकणंगले रेल्वे स्थानक इचलकरंजी शहरापासून फक्त चार कि.मी.वर आहे. पंचगंगा साखर कारखान्यापर्यंत शहराची वाढ झाली आहे. हातकणंगले स्थानकाला सर्व सुविधा देऊन इचलकरंजी-हातकणंगले रस्ता सहापदरी करून शहर ते स्थानक बसने आणि रिक्षाने जोडली तर शहरासह परिसराचा कायापालट होईल. हातकणंगले रेल्वे स्थानक ते इचलकरंजी शहराची उपनगरे आज जुळी वसाहती बनत आहेत. कोल्हापूर रेल्वे स्थानकपासून पाचगाव, बालिंगा, कसबा बावडा ही उपनगरे आठ ते दहा कि.मी.वर आहेत. म्हणून रेल्वे तेथे पोहोचली का. तसेच पुणे, रत्नागिरी अशी अनेक उदाहरणे आहेत की, ही रेल्वे स्थानक आणि उपनगरे यांचेअंतर पाहता इचलकरंजीऐवजी हातकणंगले रेल्वे स्थानकच्या विकासाला रेल्वे प्रशासनाकडून न्याय दिला पाहिजे.
रुंदीकरण नाही; मग इचलकरंजी रेल्वे कशासाठी?
गेल्या ७० वर्षांमध्ये मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाचे रुंदीकरण झालेले नाही. दोन लाईनचा रेल्वे टॅÑक करण्यासाठी सत्तर वर्षे गेली अद्याप या रेल्वेमार्गासाठी आर्थिक निधी नाही, तर इचलकरंजी रेल्वेमार्गासाठी निधी वाया का घालविला जात आहे याचे कोडे सुटत नाही. देशामध्ये मुंबई शहर वगळता कोठेही लोकल रेल्वेसेवा नाही. छोटी शहरे रेल्वेने जोडण्यामध्ये इचलकरंजीचा समावेश करून रेल्वे प्रशासन काय साध्य करणार आहे. मिरज ते कोल्हापूर व्हाया इचलकरंजी रेल्वेसेवा आर्थिक खर्चाकडून परवडणारी आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनी आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे.
अनाठायी खर्च
तालुक्यातील पंचगंगा, शरद, जवाहर या साखर कारखान्यांची साखर असो की गावभागातील सूतगिरण्यांचा कच्चा माल असो, इचलकरंजी शहरातील कापड गाठीपासून सूत, कापूसपर्यंत तयार माल असो, या सर्व मालाची आयात किंवा निर्यात करताना कोल्हापूर किंवा मिरज रेल्वे डॉकयार्डचा वापर होतो. रेल्वे प्रशासनाने हातकणंगले रेल्वे स्थानकाचा विकास केला तर हातकणंगले डॉकयार्डमुळे आयात कच्चा माल आणि निर्यात पक्क्या मालाची सोय होऊन पंचक्रोशीचा विकास होईल. यासाठी रेल्वे प्रशासनाकडे निधी नाही. मग हातकणंगले-इचलकरंजी आठ कि.मी. रेल्वेमार्गासाठी अनाठायी खर्च कोणाच्या भल्यासाठी, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे.